भारताने रविवारपासून सुरु झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. उपकर्णधार के. एल. राहुलने (२४८ चेंडूंत नाबाद १२२ धावा)सेंच्युरिअनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर शतकी नजराणा पेश केला. राहुलने सलामीला साकारलेल्या सातव्या शतकासह मयांक अगरवालने (१२३ चेंडूंत ६०) अर्धशतकी योगदान दिल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९० षटकांत ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली होती. १७ चौकार आणि एका षटकार लगावणारा राहुल १२२, तर माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत आहे. विशेष म्हणजे या सामन्यामध्ये रहाणेला लय गवसल्याने चाहत्यांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र त्याचवेळी रहाणेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सतत्याने अपयशी ठरणाऱ्या रहाणेला लय गवसण्यामागील गुपित म्हणजे हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय.
सामन्यात काय घडलं?
नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल-मयांक या कर्नाटकच्या जोडीने कोहलीचा निर्णय सार्थ ठरवत ११७ धावांची सलामी नोंदवली. उपाहारापर्यंत भारताने बिनबाद ८३ धावा केल्या. दुसऱ्या सत्रात सहावे कसोटी अर्धशतक झळकावल्यावर मयांक एन्गिडीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पुढच्याच चेंडूवर अनुभवी चेतेश्वर पुजाराला शून्यावर माघारी पाठवून एन्गिडीने भारताला दुसरा झटका दिला. त्यानंतर राहुलने कोहलीच्या साथीने संघाला सावरले. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी महत्त्वपूर्ण ८२ धावांची भागीदारी केली; परंतु उजव्या यष्टीबाहेरील चेंडूला छेडण्याचा मोह कोहलीला आवरता आला नाही. त्यामुळे ३५ धावांवर एन्गिडीच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. पाचव्या क्रमांकावरील रहाणेने सुरुवातीपासूनच सकारात्मक खेळ केला. राहुलने दुसऱ्या बाजूने आफ्रिकेविरुद्धचे पहिले शतक साकारून भारताला सुस्थितीत नेले. राहुल-रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी ७३ धावांची भर घातली आहे.
सातत्याने अपयशी…
रहाणेची खेळीराहुल आणि मयांकच्या खेळीबरोबर कोहलीने केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीबरोबरच रहाणेची खेळीही भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का ठरलीय. ८१ चेंडूंमध्ये ४० धावा करणाऱ्या रहाणेने ३२ धावा आठ चौकारांच्या मदतीने केल्यात. मागील काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असल्याने रहाणेवर संघाबाहेर बसण्याची टांगती तलवार होती. २०२१ मध्ये सध्या सुरु असणारा सामना वगळता रहाणेला १२ कसोटी सामन्यांमध्ये १९.५७ च्या सरासरीने केवळ ४११ धावा करता आल्यात. दुखापतीमुळे रहाणेचं उपकर्णधारपदही के. एल. राहुलकडे गेलं. मात्र रहाणेने या सामन्यात किमान पहिल्या दिवशी तरी संयमी सुरुवात केलीय. आपल्याला दिलेली संधी हे संघ व्यवस्थापनाने केलेलं योग्य सिलेक्शन असल्याचं रहाणेनं पहिल्याच दिवशी दाखवून दिलं.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये गोलंदाज रनअप घेत असताना रहाणे सातत्याने, ‘वॉच द बॉल’ म्हणजेच चेंडूवर लक्ष ठेव असं स्वत:ला सांगताना दिसत आहे. त्याच्या फलंदाजीमधील सुधारणेमागे त्याने स्वत:ला दिलेलं प्रोत्साहन कारणीभूत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर कालच्या सामन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे करण्यात येतेय.
गोलंदाज रनअप घेत असताना रहाणेसारखा अनुभवी खेळाडू स्वत:ला चेंडूवर लक्ष ठेवण्यास सांगताना दिसतोय. यावरुन क्रिकेट अशा अनुभवी खेळाडूसोबतही किती क्रूरतेने वागू शकतं हे दिसतं, असं निखिल दुबे या क्रिकेट चाहत्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलंय.
तर अन्य एकाने रहाणे स्वत:ला चेंडूवर लक्ष ठेवण्यास सांगतोय. त्याने ते काम अगदी योग्य केलंय, असं म्हणत रहाणे सी द बॉल म्हटलेल्या चेंडूवर चौकार लगावताना व्हिडीओ पोस्ट केलाय.
सोमवारी, राहुलला कारकीर्दीतील चौथे दीडशतक झळकावण्याची संधी आहे तर रहाणेलाही मोठी खेळी करुन टीकाकारांची तोंडं बंद करण्याची संधी या सामन्याच्या निमित्ताने चालून आलीय.