अपेक्षेप्रमाणे कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारताने शानदार विजयासह झोकात सलामी नोंदवली. भारताच्या फलंदाजांनी धावांची बरसात केली, परंतु अपुऱ्या तयारीनिशी भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी मात्र हाराकिरी पत्करली. श्रीलंकेच्या दुबळ्या गोलंदाजीवर आक्रमक हल्ले चढवीत भारतीय सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी दिमाखदार शतके साजरी केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३६३ अशी आव्हानात्मक आणि या मैदानावरील विक्रमी धावसंख्या उभारता आली. मात्र प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा डाव मात्र ३९.१ षटकांत १९४ धावांवर कोसळला. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
फलंदाजीच्या नंदनवनात रहाणे आणि धवन यांनी २३१ धावांची दमदार सलामी नोंदवली. अनुभवी यष्टीरक्षक कुमार संगकाराने दोघांनाही जीवदान दिले, त्यावेळी धवन १० आणि रहाणे ३८ धावांवर होते. रहाणेने १०८ चेंडूंत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १११ धावा केल्या, तर धवनने १०७ चेंडूंत १४ चौकार आणि तीन षटकारांनिशी ११३ धावा केल्या आणि कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सुरेश रैनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत आपल्या दोनशेव्या सामन्यात ३४ चेंडूंत वेगवान ५२ धावा काढताना चार चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली. तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने धम्मिका प्रसादच्या अखेरच्या षटकात दोन षटकारांसह ४ चेंडूंत नाबाद १४ धावा काढताना क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले.
बाराबती स्टेडियमवर दुसऱ्यांदा तीनशेहून अधिक धावसंख्या उभारण्यात आली. १९९८ मध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३०१ धावा केल्या होत्या.
त्यानंतर, इशांत शर्माचा वेगवान मारा (३४ धावांत ४ बळी) व अक्षर पटेलच्या (२४ धावांत २ बळी) फिरकीच्या बळावर श्रीलंकेच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज महेला जयवर्धनेने सर्वाधिक ४३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ५ बाद ३६३ (शिखर धवन ११३, अजिंक्य रहाणे १११; सूरज रणदीव ३/७८) विजयी वि. श्रीलंका : ३९.२ षटकांत सर्व बाद १९४ (उपुल थरंगा २८, महेला जयवर्धने ४३, थिसारा परेरा २९; इशांत शर्मा ४/३४, अक्षर पटेल २/२४)
सामनावीर : अजिंक्य रहाणे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2014 रोजी प्रकाशित
झोकात सलामी!
अपेक्षेप्रमाणे कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारताच्या फलंदाजांनी धावांची बरसात केली, परंतु अपुऱ्या तयारीनिशी भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी मात्र हाराकिरी पत्करली.
First published on: 03-11-2014 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 1st odi india beat lanka by 169 runs