नव्या चेहऱ्यांचा समावेश असलेला भारतीय संघ जागतिक हॉकी लीग स्पर्धेत शुक्रवारी सलामीची लढत खेळणार आहे. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडिमयवर अव्वल मानांकित बलाढय़ इंग्लंडशी भारताचा मुकाबला असणार आहे. या वर्षांत हाग, नेदरलॅण्डस येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा भारतीय संघासाठी रंगीत तालीमच असणार आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल सात संघ सहभागी होत असल्याने भारतीय संघाला घरच्या मैदानावर तयारीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ लाभले आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी भारतीय संघाला नशिबाने मिळाली आहे. स्पर्धेसाठी खेळवण्यात आलेल्या पात्रता फेरीचा अडथळा भारतीय संघाने पार केला नाही. मात्र यजमान या नात्याने भारतीय संघाला समाविष्ट करण्यात आले आहे. याच वर्षी भारतात चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही होणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी आम्ही तय्यार असल्याचे सिद्ध करण्याची भारतीय संघाला मिळणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये खराब कामगिरीनंतर भारतीय हॉकीचा चेहरामोहरा बदलला आहे. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघासाठी अव्वल संघांविरुद्धच्या लढतीत खडतर कसोटी असणार आहे. गेल्या वर्षी आशिया चषकातील रौप्यपदकवगळता भारतीय संघाला काहीही चमकदार कामगिरी करता आली नव्हती. रॉटरडॅम येथे झालेल्या स्पर्धेतही भारतीय संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कटू आठवणी पुसून भारतीय संघाला दमदार खेळ करावा लागणार आहे.
 भारतीय संघ ‘अ’ गटात असून, या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जर्मनी, क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेला इंग्लंड आणि क्रमवारीत सातव्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड्स, बेल्जियम आणि अर्जेंटिना आहेत.
बचावफळी ही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असून, बीरेंद्र लाक्रा, रुपिंदरपाल सिंग, व्ही.आर.रघुनाथ, कोथजित सिंग आणि अमित रोहिदास यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ ही भारतासाठी जमेची बाजू आहे. रघुनाथ, रुपिंदर आणि अमित या त्रिकुटावर संघाची भिस्त आहे. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे संघाबाहेर राहिलेल्या सुनील आणि युवराज वाल्मिकी यांनी पुनरामगन केले आहे. या दोघांच्या जोडीने निकीन थिमय्या, मनदीप सिंग आणि अफान युसुफ या युवा शिलेदारांवर संघव्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे.
पी.आर.श्रीजेश हा अनुभवी गोलरक्षक भारतीय संघाच्या डावपेचांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सरदारा सिंगसह एस.के.उथप्पा, धर्मवीर सिंग, मनप्रीत सिंग आणि चिंगलेनसना सिंग आणि एम.बी. अयप्पा यांच्यामुळे भारताचे मध्यरक्षण तगडे भासत आहे.
इंग्लंडविरुद्धची सलामीची लढत जिंकून दमदार सलामी देण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. मात्र इंग्लंडचा संघ सातत्याने चांगले प्रदर्शन करत असल्याने भारतीय संघाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.