मुंबई : सलग दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आपली लय कायम राखण्यास उत्सुक आहे. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय महिला संघाने मायदेशात झालेल्या गेल्या दोनही कसोटी सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंडला विक्रमी ३४७ धावांनी नमवल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारतीय महिला संघाने आठ गडी राखून विजय नोंदवला. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत नमविण्याचे आव्हान असेल.

हेही वाचा >>> माजी क्रिकेटपटूचा ऋषभ पंतला १.६३ कोटींना गंडा, ताज हॉटेलचे ५.५३ लाख रुपये लुबाडले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ५० पैकी केवळ १० एकदिवसीय सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे. तर ४० सामने भारतीय संघाने गमावले आहेत. घरच्या मैदानावर भारताची कामगिरी आणखीच निराशाजनक आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात २१ एकदिवसीय सामने खेळले असून त्यापैकी १७ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर गेले दोन एकदिवसीय सामने मार्च २०१२ मध्ये खेळले होते. या दोनही सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

* वेळ : दु. १.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१, जिओ सिनेमा