राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग संघटनेत असलेल्या मतभेदांमुळेच आपली ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली, असे ठाम मत व्यक्त करीत ऑलिम्पिकपटू मनोजकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारताच्या राष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेवर निवडणुकीतील गैरप्रकार व पदाधिकाऱ्यांमधील मतभेद या कारणास्तव बंदी घातली आहे. त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक मिळविता आले नाही. राष्ट्रीय संघटनेच्या अभावीच पहिल्या फेरीतील निकाल माझ्याविरोधात गेला. आपल्या संघटनेचा प्रतिनिधी तेथे असता तर निकाल माझ्या बाजूने लागला असता,’’ असे मनोजने सांगितले.
मनोजला पहिल्या फेरीत फाझलिदीन गैब्नाझारोव या उझबेकिस्तानच्या खेळाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. फाझलिदीनने सुवर्णपदक जिंकले. जून महिन्यात ऑलिम्पिक प्रवेशिका निश्चित झाल्यानंतर मनोजला केंद्र शासनाच्या ऑलिम्पिक पदक व्यासपीठ (टॉप) या योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते. मनोज म्हणाला, ‘‘मला अपेक्षेइतके आर्थिक पाठबळ मिळाले नाही. ऑलिम्पिक प्रवेशिका निश्चित करण्यासाठी झालेल्या स्पर्धामध्ये भाग घेताना मला खूप संघर्ष करावा लागला. या स्पर्धासाठी निधी जमविण्याकरिता मला खूप खटाटोप करावा लागला. गेल्या चार वर्षांमध्ये संघटना स्तरावर देशात खूप गोंधळ दिसून येत असून त्याचा फटका गुणवान खेळाडूंना बसत आहे. मी स्वत: पंतप्रधानांना लवकरच भेटणार असून या खेळातील सद्य:स्थिती सांगणार आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाच झालेली नाही. त्यामुळे नवोदित व युवा खेळाडूंना चांगल्या स्पर्धेत भाग घेण्याची संधीच मिळत नाही. साहजिकच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभवही मिळत नाही.’’
मनोजने २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या कामगिरीनंतर तो नोकरीस असलेल्या रेल्वे खात्याने त्याला बढती देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.