भारताचा कर्णधार विदित गुजराथी आणि जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी यांना ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत उर्वरीत लढतींसाठी हॉटेलची खोली देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मंगोलियाविरुद्ध शनिवारी गुजराथी आणि हम्पी यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पराभव झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला त्या लढतीत मंगोलियाविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली होती. विदित आणि हम्पी यांना स्पर्धेतील उर्वरीत लढती खेळण्यासाठी पंचतारांकित हॉटेलची खोली देण्याचे आश्वासन अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाकडून (एआयसीएफ) देण्यात आले आहे. ‘‘सर्व खेळाडूंना शक्य ती मदत पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंटरनेटची अडचण आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने विदित आणि हम्पीसाठी त्यांच्या शहरांमध्ये ताज हॉटेलची खोली देण्यात येईल. जर अन्य खेळाडूंनाही घरातून स्पर्धा खेळण्यास अडचण येत असेल तर त्यांच्यासाठीही हॉटेल आरक्षित करण्यात येईल,’’ असे ‘एआयसीएफ’चे सचिव भरत सिंग चौहान यांनी सांगितले.

हम्पीने अर्थातच करोनाच्या काळात हॉटेलात राहण्यास नकार दिला आहे. याउलट विदितने दोन दिवसांत त्याचा निर्णय कळवणार असल्याचे सांगितले. ‘‘विजयवाडा येथे मंगोलियाच्या लढतीआधी संपूर्ण रात्र पाऊस पडत होता. यास्थितीत वीजपुरवठा हा गंभीर मुद्दा होता. अर्थातच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी इंटरनेटची अडचण मंगोलियाविरुद्धच्या लढतीत आली. त्यातच करोनाच्या काळात हॉटेलात राहणे मला आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित वाटत नाही,’’ असे हम्पीने सांगितले.

भारताने चीनला रविवारी ४-२ नमवत सहजपणे ‘अ’ गटातून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर ग्रीस किंवा अर्मेनिया यांचे २८ ऑगस्टला आव्हान असणार आहे. ‘‘वीजपुरवठय़ाचा नाशिकमध्ये सध्या प्रश्न असला तरी त्यातून मार्ग काढून मी स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न करत आहे. चीनला नमवून आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी दाखवली. हॉटेलात राहण्यासंदर्भातील माझा निर्णय लवकरच कळवेन,’’ असे विदितने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian chess federation wakes up after power outage abn
First published on: 25-08-2020 at 00:09 IST