दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीत गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली. त्यातही कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीने क्रीडारसिकांची मनं जिंकली. दक्षिण आफ्रिकेत या हंगामात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये या दोन्ही गोलंदाजांनी मिळून ३० विकेट्स मिळवले. मुख्य म्हणजे या दोन्ही गोलंदाजांच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या पट्टीच्या फलंदाजांचेही धाबे दणाणल्याचं पाहायला मिळालं. एक प्रकारे कर्णधार विराट कोहलीने दिलेली जबाबदारी त्या दोघांनीही लिलया पेलली. पण, याचं खरं श्रेय हे महेंद्रसिंह धोनीचं असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघातील पूर्व खेळाडू अतुल वासन यांनी दिली.

वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासन यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना हे वक्तव्य केलं. ‘माझ्या मते या दोन्ही खेळाडूंनी जितके बळी घेतले त्याचं अर्ध श्रेय महेंद्रसिंह धोनीचं आहे. विकेटच्या मागे उभं राहून धोनी त्याची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. गोलंजाने फेकण्यापूर्वीच फलंदाज कोणत्या दिशेने आणि कोणता शॉट खेळण्याच्या तयारीत आहे याचा धोनीला पूर्ण अंदाज असतो. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांसाठी धोनीचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं ठरतं. मुळात या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाहीये, त्यामुळे धोनी त्यांना जे मार्गदर्शन करतोय, ते अतिशय मोलाचं आहे. ज्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे’, असं वासन म्हणाले.

वाचा : आयपीएल ११ चे वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि चेन्नई संघांमध्ये पहिली लढत

भारतीय क्रिकेट संघात येणाऱ्या बऱ्याच युवा खेळाडूंसाठी महेंद्रसिंह धोनी प्रेरणास्थानी असतो. त्यातही या खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात सुधारणा करणं ही खेळाडूंच्या हाती आलेली एक सुवर्णसंधी असल्याचं मतही अनेकांनी मांडलं आहे. दरम्यान, मंगळवारी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप आणि चहलच्या जोडीने यजमान संघाचा गाशा गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात कुलदीपने ४ तर चहलने विरोधी संघाचे २ गडी बाद केले होते. मालिकेत या दोन्ही खेळाडूंची कामगिरी पाहता येत्या काळात त्यांच्या गोलंदाजीवरही संघाची मदार आहे, असं म्हणायला हरकत नाही.