महिला क्रिकेट विश्वातील स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅनियल वॅटने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलला ट्रोल केलं आहे. डॅनियल वॅटने युजवेंद्र चहलला ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी जेव्हा चहलने ऋषभ पंतसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, तेव्हाही डॅनियल वॅटने त्याचा पाय खेचत ट्रोल केलं होतं.
डॅनियल वॅटने नुकतंच इन्स्टाग्रामवर आपला सरावादरम्यानचा एक फोटो शेअर केला. मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा आपण अॅक्शनमध्ये आलो असल्याचा आनंद यावेळी तिने व्यक्त केला. फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मेलबर्नमध्ये पुन्हा परतल्यानंतर चांगलं वाटत आहे”.
यावेळी युजवेंद्र चहलने फोटोवर कमेंट करत डॅनियल वॅटचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही डॅनियल वॅटनेचे बाजी मारली आणि असं उत्तर दिलं ज्यामुळे चहलची बोलतीच बंद झाली.
चहलने फोटोवर “666666” अशी कमेंट केली होती. यावेळी त्याने हसतानाचे स्माइलीही टाकले होते. यावर डॅनियल वॅटने उत्तर देत, तू गोलंदाजी करत असशील तर नक्की असं म्हटलं.
डॅनियल वॅटनेचे हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून यामुळे चहल पुन्हा एकदा ट्रोल झाला.