Suryakumar Yadav Birthday Surprise From Fans Video: आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तान संघावर सहज विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावत संघाचा विजय निश्चित केला आणि नाबाद माघारी परतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्यावर संघाने बंदी घालावी अशी भारतीय चाहत्यांची मागणी होती. पण सामना खेळवला गेला आणि भारताने दणक्यात विजय मिळवला. सूर्यादादाने सामन्यानंतर आपल्या वक्तव्याने सर्वांचं मन जिंकलंच पण चाहत्यांनी मात्र सूर्यादादाला गिफ्ट दिलं.

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मात्र संघासाठी फारसा फायदेशीर ठरला नाही. कारण भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ फक्त १२७ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १६ षटकांत हे लक्ष्य गाठत विजय निश्चित केला.

पाकिस्तानने दिलेल्या १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वादळी सुरूवात केली. नंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी घेत शानदार फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. सूर्याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. याशिवाय विजयी षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

सूर्यकुमार यादवला चाहत्यांनी दिलं वाढदिवसाचं सरप्राईज

भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रूमकडे रवाना झाले. कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूशी ना त्यांनी चर्चा केली ना हात मिळवला. याशिवाय टीम इंडियामधील एकही खेळाडू मैदानावर आला नाही. तर सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यानही सूर्याने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही वा चर्चा केली नाही. सूर्यादादाच्या या निर्णयाने सर्वांचं मनं जिंकलं.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादव प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी येताच चाहत्यांनी हॅप्पी बर्थडे सूर्या हे गाणं गात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मुलाखत घेणाऱ्या संजय मांजरेकर यांनीही चाहत्यांबरोबर गाणं म्हणत सूर्यकुमारला शुभेच्छा दिल्या.

सूर्यकुमार यादवचं भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर मोठं वक्तव्य

सूर्यकुमारने यानंतर भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि अखेरीस बोलून झाल्यानंतर त्याने पहलगाम हल्ल्यातील कुटुंबांचा उल्लेख करत त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. याशिवाय भारताचा आशिया चषकातील पाकिस्तानवरील विजय भारतीय लष्कराला समर्पित केला. सूर्यकुमार यादवच्या या कृतीने आणि त्याच्या वक्तव्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.