अखेरच्या साखळी लढतीत विदितवर महत्त्वपूर्ण विजय

चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ग्रँडमास्टर विदित गुजराथीला हरवून चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

रविवारी झालेल्या १५व्या आणि अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदने विजयानिशी विदितचे आव्हानसुद्धा संपुष्टात आणले. ३५व्या चालीला झालेल्या विदितच्या चुकीचा प्रज्ञानंदने फायदा घेतला. आता उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदपुढे चीनच्या वेई यि याचे आव्हान असेल. १६ वर्षीय प्रज्ञानंदने सहाव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते. तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील कार्लसनला प्रथमच हरवले होते.

साखळी टप्प्याअखेरीस प्रज्ञानंदला (२५ गुण) नेदरलँड्सचा अनिश गिरी (२९ गुण), नॉर्वेचा कार्लसन (२८ गुण) आणि चीनचा िडग लिरेन (२५ गुण) यांच्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रज्ञानंदने आठ विजय मिळवले, तर चार सामने गमावले. याचप्रमाणे तीन सामन्यांत बरोबरी स्वीकारली. १३व्या फेरीत प्रज्ञानंदने अमेरिकेच्या अभिमन्यू मिश्रावर ४१ चालींत शानदार विजय मिळवला, तर १४व्या फेरीत अमेरिकेच्याच सॅम शँकलँडशी बरोबरी साधली. पी. हरिकृष्णलाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. अनुभवी हरिकृष्णला (१८ गुण) नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर १७ गुण मिळवणाऱ्या विदितला ११वा क्रमांक मिळाला.