भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने मार्लोव येथील बिशम अ‍ॅबे स्पोर्ट्स केंद्रात सुरू असलेल्या हॉकी स्पध्रेत हॅम्पस्टीड अ‍ॅण्ड वेस्टमिंस्टर संघावर ३-० असा विजय मिळवला. वरुण कुमारने दोन गोल, तर अजय पांडेने एक गोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही संघांनी संयमी सुरुवात करताना मध्यरेषेजवळच खेळ करण्यास प्राधान्य दिले. हळूहळू रणनीतीत बदल करीत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या वर्तुळात चढाई केली. भारताने गोल करण्याची संधी निर्माण केली खरी, परंतु त्यांना फायदा घेता आला नाही. पहिल्या सत्राला काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना अजय पांडेने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर सिमरनजीत आणि निळकंठ यांना गोल करण्याची संधी चालून आली, परंतु प्रतिस्पर्धी संघांच्या गोलरक्षकाने त्यांचे आक्रमण थोपवले. मात्र वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला २-० असे आघाडीवर आणले.

प्रचंड दबावाखाली आलेल्या हॅम्पस्टीड संघाने भारताच्या बचावफळीवर दडपण निर्माण केले आणि चेंडूवर ताबा मिळवत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. भारतीय खेळाडूंनीही त्यांना सडेतोड उत्तर देत त्यांचे प्रयत्न अपयशी ठरवले. अखेरच्या दहा मिनिटांत भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि वरुणने त्यावर सहज गोल करून भारताचा ३-० असा विजय निश्चित केला.

 

भारताच्या युवा फुटबॉल संघाचा आंतरराष्ट्रीय दौरा

पीटीआय, नवी दिल्ली

भारतात २०१७ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पध्रेच्या (१७ वर्षांखालील) तयारीसाठी यजमानांनी चांगलीच कंबर कसली आहे. यजमान म्हणून या स्पध्रेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी भारताच्या १६ वर्षांखालील संघाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा १६ वर्षांखालील ‘अ’ संघ जर्मनीच्या दौऱ्यावर गेला असून गोवा येथे सराव करीत असलेल्या ‘ब’ संघासाठी मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्याचा मानस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) व्यक्त केला आहे. गुरुवारी हा संघ रशियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

याबाबत एआयएफएफचे तांत्रिक संचालक स्कॉट ओ’डोनेल म्हणाले की,‘ युरोपियन संघाविरुद्ध आपल्या कामगिरीची चाचपणी करण्याची चांगली संधी भारतीय संघाला मिळणार आहे. तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना वेळ लागेल, परंतु हा अनुभव त्यांच्यासाठी संस्मरणीय असेल, अशी आशा करतो.’

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian junior hockey team victory
First published on: 28-07-2016 at 04:05 IST