गेल्या दोन दशकांत भारतीय पुरुष फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम स्थानावर झेप घेतली, परंतु या स्थानावर कायम राहण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताने १०१व्या स्थानावर झेप घेतली. १९९६ सालानंतर भारताने जागतिक क्रमवारीत घेतलेली ही मोठी उडीच म्हणावी लागेल. गेल्या महिन्यात जागतिक क्रमवारीत १३२व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने एका महिन्यात ३१ स्थानांची सुधारणा करणे हे फुटबॉल प्रेमींसाठी आशादायक चित्र आहे. मात्र ही क्रमवारी भारतीय फुटबॉलची खरी प्रतिमा दाखवते का?

या महिन्याभरात त्यांनी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत कम्बोडियावर ३-२ असा विजय मिळवला, तर एएफसी आशियाई चषक पात्रता स्पध्रेत म्यानमारवर   १-० अशी मात करून इतिहास घडविला. भारताने ६४ वर्षांत म्यानमारवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. या उत्तुंग भरारीचे श्रेय संघाला आणि प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टनटाइन यांना द्यावेच लागेल. ‘‘हा मार्ग खडतर होता. नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन संघात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही राबवली. आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचा आंनद आहे,’’ अशी प्रतिक्रिया कॉन्स्टनटाइन यांनी दिली होती. मात्र त्याच वेळी हे स्थान टिकवणे ही सोपी गोष्ट नसेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. भारतासमोरील पुढील आव्हान लक्षात घेता कॉन्स्टनटाइन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आणखी नवनवीन उपक्रम राबवावे लागतील हे निश्चित. त्यामुळे ही केवळ संघाची नव्हे, तर राष्ट्रीय संघटनेहीचीही कसोटी आहे, हेही तितकेच खरे आहे.

भारताच्या या यशोगाथेत मुख्य नायक असतील तर ते कॉन्स्टनटाइन. त्यांनी २०१५ साली भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा खांद्यावर घेतली. त्यावेळी भारतीय संघ जागतिक क्रमवारीत १७१व्या स्थानावर होता. दोन वर्षांत त्यांनी राबवलेल्या योजनांचे फलित म्हणूनच भारत क्रमवारीत शंभराच्या सीमेवर पोहोचला आहे. युवा खेळाडूंवर अधिक विश्वास, सातत्याने नवनवीन प्रयोग, परंतु त्याच वेळी अनुभवी खेळाडूंना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या रणनीतीने भारताला यशाच्या शिखरावर स्वार होण्याची ऊर्जा दिली. भारत अजून या शिखराच्या पायथ्याशीच आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण जसजसा भारतीय संघ क्रमवारीत आगेकूच करेल, तसा त्यांच्यासमोरील आव्हानंही वाढतील. ही वस्तुस्थितीही कॉन्स्टनटाइन आणि कर्णधार सुनील छेत्री जाणून असला तरी संघातील खेळाडू आणि संघटक आनंदात मश्गूल आहेत. त्यांना त्वरित जागे न केल्यास होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही.

भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने सूचक विधान केले आहे. तो म्हणाला, ‘‘माझ्या मते क्रमवारी हे एका यशानंतरचे चंचल मापन आहे आणि त्यानुसार ते पुढे कायम राहीलच याची खात्री नाही. तुम्ही एक सामना गमावल्यास थेट ४० स्थानांची घसरण होऊ शकते किंवा एक विजय मिळवल्यास ५० स्थानांची झेपही घेऊ शकता. त्यामुळे या यशाच्या गुंगीत राहू नका. पुढील तीन-चार वष्रे या स्थानावर कायम राहिल्यास किंवा त्यात सुधारणा केल्यास, खरे यश म्हणावे लागेल.’’ फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताने जागतिक क्रमवारीत ९४व्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतरची भारताची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.  २००४ साली भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या छेत्रीसाठी ही गोष्ट फार आनंददायी आहे. तो म्हणतो, ‘‘वैयक्तिक मत विचाराल, तर मला इतरांपेक्षा अधिक आनंद झाला आहे. लहान-मोठय़ा यशाचा आनंद जरूर लुटायला हवा, परंतु त्याच क्षणी आता खरी कसोटी सुरू झाल्याचे भान विसरता कामा नये.’’

या यशस्वी वाटचालीबाबत चर्चा करताना भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाची आठवण होणे साहजिकच आहे. १९५० ते १९६० हे दशक भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुगाचा काळ मानला जातो. आशियाईतील सर्वोत्तम संघांमध्ये भारतीय संघाची नोंद केली गेली ती याच दशकात. प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९५१ आणि १९६२च्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले, तर १९५६च्या ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढती बल्गेरियाने ३-० असा विजय मिळवला. ही ऑलिम्पिक स्पर्धा स्मरणात राहिली ती नेव्हील डिसुजा यांच्या हॅट्ट्रिकमुळे. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसुजा यांनी हॅट्ट्रिक नोंदवली आणि ऑलिम्पिक इतिहासात आशियाई देशातील खेळाडूने नोंदवलेली ती पहिलीच हॅट्ट्रिक होती. त्यानंतर मात्र १९७० ते २००० या कालावधीत भारतीय फुटबॉल रसातळाला गेला. आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील भारताची कामगिरी सातत्यपूर्ण होत नव्हती. १९८४मध्ये भारताने एएफसी आशियाई चषक स्पध्रेत १९६४नंतर पहिल्यांदा पात्र ठरण्याची किमया केली. त्यातही भारताला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. भारताने दक्षिण आशियाई स्पध्रेत १९८७ साली जेतेपदाचा चषक उंचावला. त्यानंतर १९९३, १९९७ आणि १९९९ मध्ये सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली

पण, एकूण कामगिरीवर नजर टाकल्यास त्यात प्रचंड घसरण झाली होती. २००० ते २०११ या कालावधीत भारताने कामगिरीचा आलेख चढा ठेवला. २००३ मध्ये कॉन्स्टनटाइन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अ‍ॅफ्रो-आशियाई स्पध्रेचे उपविजेतेपद पटकावले. त्या कामगिरीमुळे कॉन्स्टनटाइन यांना आशियाई फुटबॉल महासंघाने सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवले. २००५मध्ये कॉन्स्टनटाइन यांच्या जागी सय्यद नयीमुद्दीन यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र एका वर्षांतच त्यांच्याकडून प्रशिक्षकपद काढून घेण्यात आले आणि ते बॉब हॉगटन यांच्याकडे सोपविले. त्यांच्या मार्गदशनाखाली भारताने सीरियाला नमवून नेहरू चषक जिंकला. २००८चा एएफसी चॅलेंज चषक उंचावत भारताने २०११च्या आशियाई चषक स्पध्रेची पात्रता मिळवली. २७ वर्षांनंतर भारत आशियाई चषक स्पध्रेत खेळण्यासाठी पात्र ठरला. या स्पध्रेत हॉगटन यांनी युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याबरोबर भारताने २०१५च्या चॅलेंज चषक स्पध्रेची पात्रता मिळवली. चांगले निकाल देऊनही एआयएफएफने हॉगटन यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक प्रशिक्षक बदलूनही भारताला चांगली कामगिरी करता आली नाही. २०१५ मध्ये कॉन्स्टनटाइन यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आत्तापर्यंत भारताने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची कामगिरी सातत्याने बहरली आहे. मार्च २०१५ मध्ये भारतीय संघ १७३ व्या स्थानावर होता. त्यानंतर ते आत्तापर्यंत भारताने एकूण १३पैकी ११ सामन्यांत विजय मिळवला. यामध्ये भूतानविरुद्धच्या एका अनधिकृत सामन्याचाही समावेश आहे. या विजयपथावर भारताने ३१ गोल्सचा पाऊस पाडला. पण, ही सुधारलेली क्रमवारी भारतीय फुटबॉलची वस्तुस्थिती समोर आणते का? तर नाही. आशियाई देशांमध्ये भारताने बलाढय़ इराक, जॉर्डन, ओमान आणि उत्तर कोरिया या संघांना पिछाडीवर टाकल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लढतीत इराकने आशियाईत अव्वल संघ इराणला   १-० असे नमवण्याची आणि ऑस्ट्रेलियाला १-१ अशी बरोबरीत रोखण्याची किमया केली आहे. असे असूनही त्यांच्या क्रमवारीत अवघ्या पाच स्थानांची सुधारणा होणे, पचनीय नाही. ओमानच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांनी २०१८ विश्वचषक पात्रता स्पध्रेत भारतावर होम-अवे अशा दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. २०१०चा विश्वचषक खेळणारा उत्तर कोरिया आणि जॉर्डन यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि भारताला त्यांच्याविरुद्ध खेळणे कठीण गेले आहे, असे इतिहास सांगतो. विविध निकषांवर फिफा प्रत्येक महिन्यांत क्रमवारी जाहीर करत असतो. सप्टेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत भारताने एकही सामना न खेळता २३ स्थानांची झेप कशी घेतली, ते कळणे कठीण आहे. त्यामुळे ही आकडेवारी म्हणजे भारतीय फुटबॉल क्षेत्रात झालेली प्रगती, असा समज करणे घातक ठरेल. भारताची खरी कसोटी जून महिन्यात लागणार आहे. जूनमध्ये भारत लेबनॉनविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत खेळणार असून त्यापाठोपाठ आशियाई चषक पात्रता स्पध्रेत किर्गिजस्थान त्यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. या दोन सामन्यांच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल, की भारत खरच जागतिक क्रमवारीत १०१व्या स्थानावर राहण्यास पात्र आहे की नाही. जर त्यांनी विजय मिळवल्यास ते शंभराच्या आत प्रवेश करू शकतात. मात्र, त्याच वेळी पराभव झाल्यास पुन्हा मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे भारताची आता खरी कसोटी लागणार आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा