भारतीय कसोटी संघातला सलामीवीर के.एल.राहुल याचं पुनरागमन आणखी एका कारणामुळे गाजतंय. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या राहुलची श्रीलंका दौऱ्यात पुन्हा एकदा निवड झाली आहे. श्रीलंकेला रवाना होण्याआधी राहुलने आपला नवीन लूक समोर आणलाय. हार्दीक पांड्याने आपल्या इनस्ट्राग्राम अकाऊंटवरुन राहुलसोबत फोटो काढत, राहुलला संघात केलेल्या पुनरागमनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला राहुल हा आपल्या धडाकेबाज खेळासह त्याच्या हेअरस्टाईलमुळेही चांगलाच चर्चेत होता. गेल्या काही दिवसात टीम इंडियाच्या रोहीत शर्मा, हार्दीक पांड्या यांनीही आपला बदललेला लूक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर आणला होता. आगामी श्रीलंका दौऱ्यात के.एल.राहुल शिखर धवनसोबत भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. खांद्याच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे मुरली विजयला संघातून वगळण्यात आलं होतं.
अवश्य वाचा – हार्दीक पांड्याचा नवीन हेअरकट पाहिलात का?
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० सामना खेळणार आहे. २६ जुलैपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बऱ्याच महिन्यांच्या अंतरानंतर संघात पुनरागमन करणारा के.एल.राहुल श्रीलंकेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – रोहित शर्माच्या नव्या हेअरकटची चाहत्यांनी उडवली खिल्ली