आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी भारताची स्थिती ‘सुवर्ण हुकले, नेम चुकले’ अशी झाली. वादळी वाऱ्यांमुळे नौकानयनपटू दुष्यंत चौहानला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु गेले चार दिवस पदकांची लयलूट करणाऱ्या नेमबाजांची झोळी मात्र बुधवारी रिक्त राहिली. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला ऐकरीतील आपल्या अभियानाला शानदार प्रारंभ केला आहे. फक्त एका कांस्यपदकाची भर घालणाऱ्या भारताची गुणतालिकेत दोन स्थानांनी घसरण झाल्याने तो १५व्या स्थानी आहे. तथापि, चीनने सर्वाधिक ९९ पदकांसह अव्वल स्थान राखले आहे, तर यजमान दक्षिण कोरिया दुसऱ्या आणि जपान तिसऱ्या स्थानावर आहे.
नौकानयन
सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे भारतीय नौकानयनपटू दुष्यंत चौहानचे आंतरराष्ट्रीय पदार्पणात सुवर्णपदकावर मोहोर उमटवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. परंतु पुरुषांच्या लाइटवेट एकेरी स्कल गटात त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सेनादलात कार्यरत असणाऱ्या हरयाणावासी दुष्यंतने दोन हजार मीटरच्या शर्यतीपैकी पहिल्या ५०० मीटरनंतर घेतलेली आघाडी अखेरच्या २०० मीटरच्या अंतरापर्यंत टिकवून ठेवली. परंतु वादळी पावसामुळे त्याचे सोनेरी स्वप्न मावळले. अन्य दोघांनी दुष्यंतला मागे टाकल्यामुळे ७ मिनिटे आणि २६.५७ सेकंदांत त्याला ही शर्यत पूर्ण करता आली.
‘‘मला सुवर्णपदकाची खात्री होती. परंतु सोसाटय़ाच्या वाऱ्यांनी माझ्या मार्गात अडथळे आणले. परंतु कांस्यपदक मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे,’’ असे २१ वर्षीय दुष्यंतने सांगितले.
पहिल्या ५०० मीटरच्या अंतरात फक्त दोन सेकंदांत दुष्यंत सुवर्णपदक विजेत्या लोक क्वान हे याच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर होता. मग दुष्यंतने क्वानला मागे टाकत आघाडी घेतली. हवामानाचा प्रभाव जाणवेपर्यंत मग त्याने सुवर्णपदकाचे स्वप्न जोपासले होते. परंतु यजमान देशाच्या ली हॅकबीओमनेसुद्धा दुष्यंतला मागे टाकल्यामुळे त्याला रुपेरी पदकानेही हुलकावणी दिली.
नेमबाजांनी सकाळाच्या सत्रात निराशा केल्यानंतर नौकानयनच्या रूपाने दिवसातील पहिले पदक आणि स्पध्रेतील १०वे कांस्यपदक भारताच्या खात्यामध्ये जमा झाले. भारतीय नौकानयन महासंघाचे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम यांनीसुद्धा दुष्यंत चौहानच्या हुकलेल्या सुवर्णपदकाबद्दल निराशा प्रकट केली. दुष्यंत या शर्यतीत आघाडीवर होता आणि त्याने सुवर्णपदक जिंकायला हवे होते, असे श्रीराम यांनी सांगितले.
नौकानयन या क्रीडा प्रकारात भारताची आशादायी कामगिरी गेल्या काही वर्षांत होत आहे. २००६च्या दोहा आशियाई क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक पटकावणाऱ्या एकेरी स्कलमधील बजरंग लाल ठाकरने चार वर्षांपूर्वी गुआंगझाऊ येथे सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती.
पाचव्या दिवशी ‘पाटी कोरी’!
नेमबाजी
आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पहिल्या चार दिवसांत जितू रायच्या सुवर्णपदकासह सहा पदके जिंकण्याची किमया साधणाऱ्या भारतीय नेमबाजांची पाचव्या दिवशी मात्र ‘पाटी कोरी’ राहिली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल आणि महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात चार पदके पटकावण्याची संधी भारताला होती. परंतु नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे यापैकी एकसुद्धा पदक भारताला प्राप्त करता आले
नाही.
पुरुषांच्या २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल सांघिक प्रकारात भारताचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. चौथ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या भारताला व्हिएतनामइतकेच १७०४ गुण मिळाले होते. परंतु ‘इनर टेन’च्या पाहणीत व्हिएतनाम भारतापेक्षा सरस ठरला. एकेरी प्रकारात हरप्रीत सिंगला सातवा क्रमांक मिळाला आणि अंतिम फेरीसुद्धा त्याला गाठता आली नाही. तथापि, गुरुप्रीत सिंग आणि पेंबा तमंग यांना अनुक्रमे १२व्या आणि २०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ५० मी. रायफल प्रोन वैयक्तिक प्रकारात सेनादलातील राज चौधरीकडून भारताला मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु ४३ नेमबाजांपैकी एकूण ६१४.६ गुणांसह तिला २२वा क्रमांक मिळाला. याशिवाय लस्जा गोस्वामीला २५वा आणि तेजस्विनी मुळेला ३६वा क्रमांक मिळाला. वैयक्तिकप्रमाणेच सांघिक प्रकारातही भारताच्या महिला संघाने निराशा केली आणि १३ संघांपैकी १८३७.१ गुणांसह भारताला ११व्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.
पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे
स्क्वॉश
आणखी एका पदकाच्या दिशेने स्क्वॉश खेळाडूंनी एक पाऊल पुढे टाकले आहे. महिला एकेरीमध्ये कांस्यपदक विजेती दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला स्क्वॉश संघाने हाँगकाँगवर २-१ असा विजय मिळवला, तर पाकिस्तानवर ३-० असा विजय मिळवत पदकाच्या दिशेने कूच केली आहे. भारतीय संघाचा चीनबरोबर गुरुवारी सामना होणार असून हा सामना जिंकल्यास त्यांना उपांत्य फेरीत पोहोचून पदक निश्चित करता येणार आहे; तर पुरुषांच्या संघाने चीनला ३-० असे निष्प्रभ केले आहे.
महिला संघाने पहिल्यांदा हाँगकाँगला २-१ असे पराभूत केले. या वेळी दीपिकाला अ‍ॅनी ऊ हिच्याकडून ११-५, ६-११, ८-११, १२-१०, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात जोश्नाने जोइ विंगला ६-११, ८-११, ११-५, ११-९, ११-९ असे पराभूत करत भारताला १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक लढतीमध्ये अनाका अलाकामोनीने टाँग डझ विंगला ११-८, ११-१३, ११-९, ११-५ असे पराभूत केले.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिलांनी ३-० असे दणदणीत यश संपादन केले. दीपिकाने मारिया वझीर टूरपकाईवर ८-११, ७-११, १२-१०, ११-९, ११-६ असा विजय मिळवला. जोश्नाने मोकादास अश्रफला ११-४, ११-८, ११-९ असे सहजपणे पराभूत केले, तर तिसऱ्या सामन्यात अपराजिता बालामुरूकनने रिफात खानचा ११-३, ११-३, ११-३ असा फडशा पाडला.
भारतीय पुरुषांनी चीनचा ३-० असा पाडाव केला. महेश माणगावकरने पहिला सामना ११-२, ११-७, ९-११, ११-२ असा जिंकला. दुसऱ्या सामन्यात हरिंदर पाल संधूने जिआकी शेनवर ११-४, ११-९, ११-५ असा सहज विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यामध्ये कुश कुमारने तिआनक्सिआ यांगचा ११-७, ११-१, ११-१ असा खुर्दा उडवला.
चीनचा भारतावर संघर्षपूर्ण विजय
हॉकी
रोमहर्षक लढतीत भारताने गतविजेत्या चीनला अखेपर्यंत झुंज दिली, मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये युदिओ झाओ हिने केलेल्या गोलच्या जोरावर चीनने २-१ असा विजय मिळविला.
सलग तीन वेळा आशियाई स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावणाऱ्या चीनने पारडे या सामन्यात अपेक्षेप्रमाणेच जड होते, मात्र भारतीय महिलांनी उत्तम सांघिक कौशल्य दाखवत त्यांचा प्रतिकार केला. १९व्या मिनिटाला मेयु लियांग हिने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत चीनचे खाते उघडले. परंतु फार काळ त्यांना या आघाडीचा आनंद घेता आला नाही. भारताला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत जसप्रित कौर हिने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर बराच वेळ ही बरोबरी कायम होती. ५१व्या मिनिटाला भारताची गोलरक्षक सविता कुमारी हिने अप्रतिमरीत्या गोल वाचविला. त्यानंतर भारताला गोल करण्याची संधी लाभली होती. पण या संधीचा फायदा ते घेऊ शकले नाहीत. जसप्रितने मारलेला फटका गोलपोस्टवरून गेला. ५९व्या मिनिटाला चीन संघाने जोरदार चाल करीत भारतीय बचावरक्षकांना चकविले. झाओ हिने अप्रतिम फटका मारून चीनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत कोरियाने विजय मिळविला.
या सामन्यातील विजयासह चीनने साखळी गटात अग्रस्थान मिळवले आहे. भारताची शेवटच्या साखळी लढतीत मलेशियाशी गाठ पडणार आहे, तर चीनची थायलंडशी लढत होईल.
पुरुषांमध्ये आज भारत-पाकिस्तान आमने-सामने
भारत व पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना नेहमीच चित्तथरारक असतो. आशियाई स्पध्रेतील पुरुष हॉकीमध्ये हे दोन परंपरागत प्रतिस्पर्धी गुरुवारी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. विजेता संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार असल्यामुळे दोन्ही संघ या स्पर्धेकडे गांभीर्याने पाहात आहेत. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळविला आहे. मात्र तरीदेखील भारतीय संघातील खेळाडूंमध्ये अनेक उणिवा दिसून आल्या आहेत. या उणिवा ते कशी मात करतात, यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे. त्यांच्या गोल करण्याच्या आशा प्रामुख्याने रुपिंदर पाल सिंग व व्ही.आर.रघुनाथ यांच्यावर आहेत.
श्वेता, रिषिका दुहेरीत विजयी
टेनिस
महिला दुहेरीमध्ये भारताच्या श्वेता राणा आणि रिषिका सुनकारा यांनी विजय मिळवला, पण महिला एकेरीमध्ये मात्र नताशा पाल्हाला पराभवाचा सामना करावा लागला. श्वेता आणि रिषिका जोडीने पाकिस्तानच्या सारा मन्सूर आणि उशना सोहेल जोडीवर ५७ मिनिटांमध्ये ६-४, ६-० असा सहज विजय मिळवला. एकेरीमध्ये नताशाला थायलंडच्या नोपावनकडून ५-७, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला. पाचव्या मानांकित सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे यांना दुसऱ्या फेरीत मंगोलियाच्या गोटोव्ह आणि बोलोर इनखबयार यांचा सामना करावा लागणार आहे. पुरुष एकेरीमध्ये सनम सिंगपुढे कुवेतच्या अल्शाटी अब्दुल्हामीदचे आव्हान असेल, तर युकी भांब्रीला कतारच्या जबोर मोहम्मद अल मुतावाचा सामना करावा लागणार आहे.
विकासला सातवा क्रमांक
वेटलिफ्टिंग
भारतीय वेटलिफ्टिंगपटूंची खराब कामगिरी पाचव्या दिवशीसुद्धा दिसून आली. ८५ किलो वजनी गटात विकास ठाकूरला सातवा क्रमांक मिळाला. ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळवणाऱ्या विकासने स्नॅचमध्ये १४८ किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये १७९ किलो वजन उचलले. परंतु पदक मिळवण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही.
वर्षां, ऐश्वर्या अव्वल
नौकानयन
वर्षां गौतम आणि ऐश्वर्या नेडूनचेझियान या खेळाडूंनी महिलांच्या नौकानयन (सेलिंग) स्पध्रेच्या २९ ईआर प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. १२ वर्षीय चिर्तेश ताथाला पुरुष एकेरीच्या ऑप्टिमिस्ट प्रकारामध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीतील ऑप्टिमिस्ट प्रकारामध्ये रामया सरावनानला सहावे तर महिला एकेरीमध्ये लेसर रॅडियल प्रकारामध्ये नेत्रा कुमनानला पाचवे स्थान मिळाले.
अखिलचा सहज विजय, शिवा थापाला पुढे चाल
बॉक्सिंग
जागतिक स्तरावर पुनरागमन करणाऱ्या अखिल कुमारने ६० किलो गटात दुसरी फेरी गाठताना नेपाळच्या पूर्णाबहादूर लामावर मात केली, तर शिवा थापाला ५६ किलो गटात लिओनील हेलो प्रादाकडून पुढे चाल
मिळाली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी विजेता खेळाडू अखिल कुमारने लामाविरुद्ध जोरदार ठोशांचा उपयोग केला. दुखापतीमुळे ३३ वर्षीय खेळाडू अखिल हा स्पर्धात्मक बॉक्सिंगपासून दूर होता. त्याने लामाविरुद्ध पहिल्या फेरीत ३०-२४ असे गुण मिळविले. दुसऱ्या फेरीत त्याला ३०-२५ असे गुण मिळाले. तिसऱ्या फेरीत लामाला अखिलने आपल्या प्रहाराने जायबंदी केले. त्यामुळे पंचांनीच लढत थांबविली आणि तांत्रिकदृष्टय़ा अखिलला विजयी घोषित केले.
आव्हान संपुष्टात
बास्केटबॉल
प्राथमिक फेरीमध्ये इराणकडून पराभव झाल्यामुळे भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ‘इ’ गटामध्ये भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतावर इराणने ७६-४१ असा विजय मिळवला. भारताकडून कर्णधार अमरितपाल सिंगने सर्वाधिक १० गुण मिळवले, तर इराणचा कर्णधार मोहम्मद समाद आणि हमेद इहादादी यांनी प्रत्येकी १६ गुण पटकावले.
पुरुष उपांत्यपूर्व फेरीत
व्हॉलीबॉल
भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने मालदीववर २५-१०, २५-१९, १५-१७ असा सहजपणे विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साखळी गटातील पहिल्या सामन्यात भारताने हाँगकाँगला पराभूत केले होते. त्यानंतर मिळवलेल्या या दुसऱ्या विजयाने भारताने अंतिम आठ संघांमध्ये स्थान पटकावले आहे. भारताचा पुढील साखळी सामना इराणशी होणार आहे.
पुरुष चौथ्या क्रमांकावर
अश्वारोहण
भारतीय पुरुष अश्वारोहण संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघामध्ये संग्राम सिंग, फौआद मिर्झा, मृत्युजंय सिंह राठोर आणि पूवीआह अजइ अप्पाचू यांचा समावेश होता. सात संघांमध्ये दक्षिण कोरिया, जपान आणि चीननंतर भारताने चौथा क्रमांक मिळवला.