पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय खेळाडू अनेक नव्या क्रीडा प्रकारांत यशस्वी होत असल्याचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशाने अधोरेखित झाले आहे. एकूणच भारतीय क्रीडा क्षेत्राला सुवर्ण दिवस येऊ लागले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी शनिवारी मोदी यांची भेट घेतली. मोदींनी या खेळाडूंचा गौरव केला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळय़ास कुस्ती, वेटलिफ्टिंगह बॉक्सिंग, बॅडिमटन आणि टेबल टेनिसपटू उपस्थित होते.

भारतीय खेळाडूंनी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत केलेली कामगिरी भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘भारतीय क्रीडा क्षेत्र आता सुवर्णयुगाच्या उंबरठय़ावर आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. भारतीय खेळाडू कुठल्याही खेळात यशस्वी होऊ शकतात, हे या स्पर्धेने दाखवून दिले,’’ असे मोदी यांनी नमूद केले. मोदी यांनी हॉकी, लॉन बॉल्स, अ‍ॅथलेटिक्स, महिला क्रिकेटमधील यशाचे विशेष कौतुक केले. ‘‘हॉकी खेळातील गतवैभव परत मिळविण्यासाठी आपले खेळाडू प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जिद्दीला दाद द्यालाच हवी,’’ असे मोदी म्हणाले. या वेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यश मिळविणाऱ्या खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.