आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषक येत्या ९ सप्टेंबरपासून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. गतविजेत्या भारतीय संघासह ८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून युएईमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या जर्सीमध्ये मोठा फरक दिसणार आहे.

आशिया चषकामध्ये टीम इंडिया स्पॉन्सरच्या लोगोविना जर्सी घालणार असल्याचं म्हटलं जात आहे. आशिया चषकासाठीच्या भारताच्या जर्सीवर आशिया चषक २०२५ चा लोगो, भारताचं नाव आणि बीसीसीआयचा लोगो असणार आहेच. पण नेहमीप्रमाणे ड्रीम ११ मात्र दिसणार नाहीये.

स्पॉन्सरशिवाय भारतीय जर्सी असण्यामागचं कारण म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल’ मंजूर करण्यात आलं आहे. या नव्या कायद्यानुसार Dream11सह सर्व प्रकारचे ऑनलाइन फँटसी स्पोर्ट्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे.

जुलै २०२३ पासून Dream11 टीम इंडियाचे मुख्य प्रायोजक आहेत. प्रारंभीच्या करारानुसार या ऑनलाइन फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मला तीन वर्षांसाठी प्रायोजकत्व हक्क देण्यात आले होते. BCCIने अजूनही Dream11 बरोबरच्या भविष्यातील कराराबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे की BCCI देशाच्या नियमांचे पालन करेल.

“जर परवानगी नसेल, तर आम्ही काहीही करणार नाही. BCCI केंद्र सरकारने ठरवलेल्या प्रत्येक धोरणाचे पालन करेल,”असे सैकिया यांनी शुक्रवारी वृत्तसंस्था एएफपीशी बोलताना सांगितले. शुक्रवारी ड्रीम 11 ने देखील अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केलं की, “कॅश गेम्स आणि कॉन्टेस्ट्स बंद करण्यात आले आहेत.” भारतीय संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलं.

ऑनलाईन गेमिंग बिल या नव्या विधेयकात काय म्हटलं आहे?

ऑनलाईन पैशांचे खेळ आणि सट्टेबाजीवर बंदी घालणाऱ्या या विधेयकानुसार, आता अशा खेळांच्या जाहिराती आणि आर्थिक सहाय्य करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं आहे. दोषींना जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

“स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, सरकारी आकडेवारीतून दिसते की फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स दरवर्षी तब्बल ४५ कोटी लोकांकडून अंदाजे २.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम घेत होते.