जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत भारतीय महिला संघाने आपल्याहुन दुबळ्या इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत रिओ ऑलिम्पिकच्या आशा कायम राखल्या आहेत. ५ ते ८ व्या स्थानासाठीची ही पहिली लढत निर्धारित वेळेते १-१ अशा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्यातही बरोबरी झाल्याने सडन डेथमध्ये राणी रामपालने गोल करून भारताला  ५-४ असा विजय मिळवून दिला.
केएचसी ड्रॅगन्स स्टेडियमवर झालेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या इटलीने १३व्या स्थानावर असलेल्या भारताला कडवी झुंज दिली. ९व्या मिनिटाला एलिसाबेट्टा पॅसेल्लाने मैदानी गोल करून इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्ऱ, ३३व्या मिनिटाला राणी रामपालने अप्रतिम गोल करून सामना १-१ ने बरोबरीत आणला. निर्धारित वेळेतही बरोबरी कायम राहिल्याने अतिरिक्त वेळ देण्यात आली, परंतु त्यात भारताने मिळालेल्या संधींवर पाणी फेरले आणि लढत पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली.
इटलीची आक्रमणपटू व्हॅलेंटिना ब्रासोनीने पहिल्याच पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून १-० अशी आघाडी घेतली. तिला भारताच्या नवजोत कौरने सडेतोड उत्तर देत सामना १-१ असा बरोबरीत आणला. इटलीसाठी दुसऱ्या प्रयत्नात डॅलिला मिराबेल्ला हिला अपयश आल्याने भारताला आघाडी घेण्याची संधी होती, परंतु वंदना कटारियाने ती दवडली आणि दोन प्रयत्नांनंतर सामना १-१ असाच होता. त्यानंतर मार्सेला कॅसेल, गिऊलिना रुग्गीएरी, चिआरा टिड्डी यांनी इटलीसाठी, तर अनुराधा थोकचॉम, राणी रामपाल, दीपिका यांनी भारतासाठी गोल करून पेनल्टी शूटआऊटमध्येही ४-४ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले. सडन डेथमध्ये मात्र राणी रामपालने पहिल्याच प्रयत्नात गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर भारत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी खेळणार असून शनिवारी त्यांचा सामना यजमान बेल्जियम आणि जपान यांच्यातील विजेत्याशी होईल. त्यामुळे ही लढत जिंकून ऑलिम्पिक प्रवेश मिळवण्याची संधी भारताला आहे. १९८० साली भारताने अखेरचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian women stay alive after prevailing in sudden death
First published on: 03-07-2015 at 03:06 IST