मुंबई : भारतीय युवा क्रिकेट संघाने (१९ वर्षांखालील) आशिया चषक स्पर्धा जिंकत योग्य दिशेने वाटचाल सुरू केली असून आगामी युवा विश्वचषकात भारत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी व्यक्त केला. 

भारतीय युवा संघाने मागील शुक्रवारी विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचे जेतेपद पटकावले.  दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला. ‘‘आमच्या संघाने योग्य दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी करत आम्हाला सामने जिंकवून दिले. आम्ही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून नव्हतो. जेव्हा अधिकाधिक खेळाडू विजयात योगदान देतात, तेव्हा प्रशिक्षक म्हणून तुम्हाला खूप समाधान वाटते. आशिया चषक स्पर्धा सामन्यांच्या सरावासाठी फायदेशीर ठरली,’’ असे कानिटकर म्हणाले.

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. ‘‘वेस्ट इंडिजमध्ये विलगीकरणाचा कालावधी संपवल्यानंतर आम्ही सरावाला सुरुवात करू. आमचे आधी सराव सामने होणार असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,’’ असेही कानिटकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे खेळाडू चमक दाखवतील!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या युवा संघात कौशल तांबे, राजवर्धन हंगर्गेकर आणि विकी ओस्तवाल या महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. ते विश्वचषकात आणि भविष्यात चमकदार कामगिरी करतील याची कानिटकर यांना शाश्वती आहे. ‘‘तिघांनीही विविध सामन्यांत चांगला खेळ केला आहे. त्यांच्यात खूप क्षमता असून त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. ते मेहनत घेत राहतील याची मला खात्री आहे,’’ असे कानिटकर म्हणाले.