तिरंगी क्रिकेट मालिका
प्रतिभावान सलामीवीर यशस्वी जैस्वालसह आणखी तीन फलंदाजांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकांच्या बळावर भारतीय युवा संघाने (१९ वर्षांखालील) तिरंगी एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात बांगलादेशचा सहा गडी व आठ चेंडू राखून पराभव करून विजेतेपद मिळवले.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसाठी तिसऱ्या स्थानावरील महमदुल हसनने (१०९) दिमाखदार शतक साकारले. सलामीवीर परवेझ हुसैनने ६० धावा करत त्याला योग्य साथ दिली. परंतु या दोघांव्यतिरिक्त सात फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यातही अपयशी ठरल्यामुळे बांगलादेशचा संघ २६१ धावांत गारद झाला. भारतासाठी सुशांत मिश्रा (२/३३), कार्तिक त्यागी (२/४९) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात यशस्वी (५०), दिव्यांश सक्सेना (५५), कर्णधार प्रियम गर्ग (७३) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ५९) या चौघांनी उपयुक्त अर्धशतके झळकावल्यामुळे भारताने बांगलादेशवर सहज वर्चस्व गाजवले. तिलक वर्माने (नाबाद १६) चौकार लगावून ४८.४ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.