भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) नव्या निवडणुका पार पडताच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) मंगळवारी भारतावरील बंदी उठवली आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि सरकारी हस्तक्षेपामुळे वर्षभरापूर्वी जागतिक ऑलिम्पिक चळवळीतून भारताला हद्दपार करण्यात आले होते, परंतु १४ महिन्यांचा वनवास संपलेल्या भारताचे मुख्य प्रवाहात परतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्वागत केले आहे. आता यापुढे कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पध्रेत भारताला डौलाने आपला तिरंगा फडकवता येऊ शकेल.
‘‘सोचीमध्ये मंगळवारी झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणी मंडळाने भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (एनओसी) आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीला मान्यता दिली,’’ असे आयओसीने पत्रकाद्वारे कळवले आहे.
‘‘आयओसीच्या शिष्टमंडळाचे प्रमुख रॉबिन मिचेल यांच्या निरीक्षणाखाली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक आणि सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारी २०१४ रोजी यशस्वीपणे झाली,’’ असे पुढे नमूद करण्यात आले आहे.
आरोपपत्र असलेले व्यक्ती पदाधिकारी असल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदी घालण्यात आली होती. परंतु १४ महिन्यांच्या लढय़ानंतर आयओसीने भारताचा हा वनवास संपवला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जागतिक स्क्वॉश महासंघाचे प्रमुख आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे छोटे बंधू एन. रामचंद्रन यांची आयओएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आयओसीच्या त्रिसदस्यीय निरीक्षकांनी आयओएच्या निवडणुकीबाबत समाधानकारक अहवाल दिला. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
‘‘राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या घटनेनुसार या निवडणुका पार पडल्या, असे आयओसीच्या निरीक्षकांनी कार्यकारिणी मंडळाला सांगितले. संघटनेचा कोणताही पदाधिकारी हा गुन्हेगार अथवा आरोपपत्र दाखल केलेला नसावा, या आयओसीच्या अटीचीसुद्धा पूर्तता करण्यात आली आहे,’’ असे आयओसीने म्हटले आहे.
४ डिसेंबर २०१४ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदी घालण्यात आली होती. सरकारी क्रीडा नियमावलीशी चिकटून राहणे आणि भ्रष्टाचारी निगडित पदाधिकारी यामुळे ही बंदी घालण्यात आली होती. रविवारी झालेल्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत अखिल भारतीय टेनिस असोसिएशनचे प्रमुख अनिल खन्ना यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अभय सिंग चौताला आणि ललित भानोत यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आयओसीच्या प्रखर आक्षेपानंतरही चौताला आणि भानोत यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतावर कायमस्वरूपी बंदी येऊ शकेल, असे दडपण जागतिक संघटनेने आणल्यामुळे या दोघांनी माघार धेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोची ऑलिम्पिकच्या समारोपात फडकणार तिरंगा
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदी घातल्यापासून भारताचे खेळाडू कोणत्याही स्पध्रेत वैयक्तिक खेळाडू म्हणून सहभागी होत होते. सध्या सोची येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटन कार्यक्रमातील संचलनात भारतीय खेळाडूंना तिरंग्यासहित सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे आयओसीच्या ध्वजासहित भारताचे खेळाडू उतरले होते, परंतु आता समारोपाच्या कार्यक्रमात भारतीय खेळाडू तिरंग्यासहित भाग घेऊ शकतील.
‘‘ऑलिम्पिक स्पर्धा चालू असताना प्रथमच एखाद्या राष्ट्रीय संघटनेवरील बंदी उठवण्यात आली आहे. हा निर्णय त्वरित अमलात आणण्यात आला आहे. कार्यकारिणी मंडळाच्या निर्णयामुळे आता भारताचे खेळाडू २३ फेब्रुवारीला होणाऱ्या समारोप सोहळ्यात राष्ट्रध्वजासह सहभागी होऊ शकतील. बंदी उठली असून भारताचे तीन खेळाडू या स्पध्रेत सहभागी झाले, हेच ऑलिम्पिकनगरीत त्या वेळी अधोरेखित होईल,’’ असे आयओसीने म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून खेळाडू आणि खेळप्रेमींनी याबाबत आवाज उठवला आणि चिंता व्यक्त केली. लुसानेमध्ये गेल्या वर्षांच्या मे महिन्यामध्ये भारत सरकारने याबाबत आवाज उठवला आणि भारतावरील बंदी उठली. खेळाची प्रतिमा स्वच्छ करण्याच्या दृष्टीने भारतावरील उठवलेली बंदी ही मोठी गोष्ट आहे. हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल मी आयओसीचे धन्यवाद मानतो. भारत सरकार व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय खेळाडू आता देशाच्या झेंडय़ाखाली खेळतील, याचा आनंद आहे. – जितेंद्र सिंग, क्रीडामंत्री.

भारतावरील बंदी उठवल्याने मी आनंदी आहे. आता भारतीय संघ आणि खेळाडूंच्या तिरंग्याखाली जागतिक स्पर्धामध्ये सहभागी होता येईल. मला आशा आहे की, देशामध्ये ऑलिम्पिकची चळवळ अधिक सुदृढ होईल. आगामी स्पर्धामध्ये चांगली कामगिरी व्हावी ही प्रशासकांबरोबर भारतीय खेळाडूंचीही जबाबदारी आहे. खेळाच्या भल्यासाठी सर्वानी एकत्रित होऊन काम करण्याची गरज आहे. आमच्याकडून देशवासीयांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांची अपेक्षापूर्ती नक्कीच करू.
– विजय मल्होत्रा, आयओएचे माजी अध्यक्ष.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias olympic ban lifted by ioc
First published on: 12-02-2014 at 12:21 IST