काठमांडू येथे सुरू झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष खो-खो संघाने श्रीलंकेचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. व्हॉलीबॉलमध्ये भारतीय संघांनी पहिल्या दिवशी अंतिम फेरी गाठली आहे.

बाळासाहेब पोकार्डेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा २१-८ असा १३ गुणांनी धुव्वा उडवला. भारताच्या अक्षय गणपुले याने ३.१० मिनिटे तर सुदर्शनने २ मिनिटे संरक्षण केले. तसेच पोकार्डेने २ आणि सागर पोद्दारने २ मिनिटे संरक्षण आणि तीन गडी बाद केले. आक्रमणात सत्यजित सिंगने ५ बळी मिळवले. अभिनंदन पाटील आणि श्रेयस राऊळ यांनीही प्रत्येकी ३ बळी मिळवत भारताच्या विजयात योगदान दिले.

महिलांमध्ये भारताने श्रीलंकेचा ३२-४ असा दणदणीत पराभव केला. अपेक्षा सुतारने ३.२० मिनिटे संरक्षण करतानाच दोन बळीही मिळवले. सस्मिता शर्माने २.३० मिनिटे तर पोर्णिमा सकपाळने ४.२० मिनिटे संरक्षण करत चार बळीही मिळवले.

भारताची अंतिम लढत पाकिस्तानशी

गतविजेत्या भारताने उपांत्य फेरीच्या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेचा पाडाव करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या व्हॉलीबॉल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. आता मंगळवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेवर २७-२५, २५-१९, २१-२५, २५-२१ असा विजय साकारला. पाकिस्तानने बांगलादेशला २५-१५, २५-२१, २६-२४ असे पराभूत केले. भारतीय महिलांनीही अंतिम फेरी गाठली असून त्यांना दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी नेपाळशी लढत द्यावी लागेल. भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत मालदीवचा तर नेपाळने श्रीलंकेचा पराभव केला. गेल्या वर्षी भारताच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले होते.