बाली : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची प्रामुख्याने भिस्त असेल. सायना नेहवाल, समीर वर्मा यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमधील यशानंतर काही महिने विश्रांती घेणाऱ्या सिंधूने पुनरागमन करताना डेन्मार्क आणि फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धाची अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरी गाठली. मात्र, २९१९च्या जागतिक अजिंक्यपदानंतर सिंधूचा जेतेपदाचा शोध कायम आहे. पहिल्या फेरीत तिच्यापुढे थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगचे आव्हान असेल.
समीरच्या अनुपस्थितीत पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, तसेच एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.