बाली : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत या भारतीयांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

महिला एकेरीत सिंधूने पहिला गेम गमावल्यावर दमदार पुनरागमन करताना जपानच्या अया ओहोरीला १७-२१, २१-१७, २१-१७ असे पराभूत केले. सिंधूचा दुसऱ्या फेरीत २३ वर्षीय जर्मन खेळाडू यव्होने लिसोबत सामना होईल.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने भारताच्याच एच एस प्रणॉयवर २१-१५, १९-२१, २१-१२ अशी सरशी साधली. दुसरीकडे, प्रणीतने फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोव्हचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत त्याच्यापुढे ख्रिस्टो पोपोव्हचे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि ध्रुव कपिला या जोडीवर पहिल्या फेरीत जपानच्या क्योही यामाशिता आणि नारु शिनोयाने ७-२१, १२-२१ अशी मात केली. रेड्डीला अश्विनी पोनप्पासह खेळताना महिला दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. त्यांना गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टेफानी स्टोएव्हाने २७—२९, १८—२१ असे नमवले. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्यामुळे त्यांना दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली.