जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडिया महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीतील अटीतटीचा सामना खेळवला गेला. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत सामन्यात कडवी झुंज दिली. भारताकडून जेमिमा रॉड्रीग्जने उत्कृष्ट शतकी खेळी केली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा, हरमनप्रीतसह संपूर्ण संघाला अश्रू अनावर झाले.
भारतीय संघाने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडिया ८ वर्षांनी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३३८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून फिबी लिचीफिल्डने शतक झळकावत ९३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली आणि संघांच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तर एलिस पेरीने ७७ धावांची, बेथ मुनीने २४ धावांची खेळी केली. तर एश्ले गार्डनरने ६३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये भारताने झटपट विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलिया अधिक धावा करू शकला नाही. भारताकडून श्री चरणी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर क्रांती, अमनज्योत व राधा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात ३३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. शफाली वर्मा १० धावा तर स्मृती मानधना २४ धावा करत बाद झाली. तर जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी १६७ धावांची भागीदारी रचत भारतासाठी या सामन्यात मोठी भूमिका बजावली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्मा २४ धावा करत माघारी परतली.
रिचा घोषने १६ चेंडूत २६ धावांची झटपट खेळी करत बाद झाली. तर जेमिमा रॉड्रीग्जने १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतली. यासह टीम इंडियाने ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ धावा केल्या.
