आठवडय़ाची मुलाखत अमित पांघल, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू

तुषार वैती, लोकसत्ता
मुंबई : देशाला ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी मी गेले काही वर्षे कसून सराव करत आहे. प्रतिस्पध्र्याच्या शैलीचा आणि ताकदीचा अभ्यास करून ऑलिम्पिक स्पध्रेची तयारी केली असून सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे, असे मत बॉक्सिंगपटू अमित पांघलने व्यक्त केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पांघलने गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे बॉक्सिंगमध्ये त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर पांघलशी केलेली ही बातचीत –

’  टोक्यो ऑलिम्पिकसाठी कितपत जय्यत तयारी झाली आहे?

करोनामुळे सरावात अनेक आव्हाने निर्माण झाली, पण या सर्वावर मात करत माझी ऑलिम्पिकसाठी जय्यत तयारी झाली आहे. अनिल धनखड यांच्याकडे मी गेली ११ वर्षे प्रशिक्षणाचे धडे घेत आहे. त्यांच्यासोबतच सराव करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीदरम्यान झालेल्या एका छोटय़ाशा दुखापतीमुळे मी काहीसा चिंतेत होतो, पण या दुखापतीतून सावरल्यानंतर मी जोमाने सरावाला सुरुवात केली होती. आता ऑलिम्पिकला अवघे काही दिवस शिल्लक असताना मी दमदार कामगिरीसाठी सज्ज झालो आहे.

’  ऑलिम्पिकसाठी पदकाचा दावेदार समजला जात असताना तुझ्यावर मानसिकदृष्टय़ा किती दडपण आहे?

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यामुळे लोकांच्या माझ्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांच्या प्रोत्साहनामुळेच मला माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळते. चाहत्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास वाढल्यामुळे प्रत्येक वेळी माझ्यावर पदक मिळवण्यासाठी दडपण असते, पण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत दडपण झुगारून मी खेळ करणार आहे.

’  आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तुला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर तुझ्या या कामगिरीवर कितपत समाधानी आहेस?

सरावात आम्ही किती मेहनत घेत होतो, हे या स्पर्धेद्वारे आम्हाला पडताळून पाहता आले. जेतेपदासाठी मी दावेदार असतानाही अंतिम फेरीत पूर्ण योगदान देता न आल्याने मी काहीसा निराश आहे, पण प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांकडून मिळालेले मार्गदर्शन पाहता, माझी वाटचाल योग्य दिशेने होत आहे, याची खात्री पटली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणे, हीसुद्धा मोठी कामगिरी म्हणावी लागेल. निकालाने मी समाधानी असून माझ्या कामगिरीवरही खूश आहे.

’  ऑलिम्पिकमध्ये तुझ्यासमोर खडतर आव्हान असताना पदकाच्या कितपत अपेक्षा आहेत?

ऑलिम्पिक ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची आणि खडतर समजली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला आव्हानांचा सामना करावाच लागतो. माझ्यासमोर खडतर आव्हान असल्यामुळेच मी समर्पित वृत्तीने कसून सराव करत आहे. माझ्या वजनी गटातील प्रतिस्पध्र्याची शैली आणि त्यांच्या क्षमतेचा अभ्यास करून त्यानुसार माझा सराव सुरू आहे. प्रत्येक प्रतिस्पध्र्यासाठी मी वेगळी रणनीती आखली आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक जण अपेक्षा घेऊनच उतरत असतो, त्यामुळे कोणत्याही प्रतिस्पध्र्याला कमी लेखून चालणार नाही, पण सुवर्णपदकावर नाव कोरण्याचा माझा प्रयत्न असेल.

’  ऑलिम्पिकसाठी भारताचे एकूण नऊ बॉक्सिंगपटू पात्र ठरले आहेत. त्यापैकी किती जणांकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल?

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताने १५ पदकांची लयलूट केल्यामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. ऑलिम्पिकआधी भारतीय बॉक्सिंगपटूंनी विक्रमी कामगिरी केल्यामुळे आमच्याकडून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत. संजित कुमार आणि पूजा राणी यांनी आपल्यातही सुवर्णपदक पटकावण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. सहा वेळा जगज्जेती ठरलेली एम. सी. मेरी कोम ही सर्वाचे आशास्थान आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मेरीकडून या वेळी सुवर्णपदकाची आशा आहे. मीसुद्धा सुवर्णपदक पटकावण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे देशाला बॉक्सिंगमध्ये तीन ते चार पदकांची अपेक्षा बाळगता येईल.