आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) नियमांनुसार निवडणुका झाल्यानंतर आता बॉक्सिंग इंडियाला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सदस्यत्व स्वीकारण्याविषयी एआयबीएकडून सांगण्यात आले. बॉक्सिंगमधील सर्व कारभार आता बॉक्सिंग इंडिया पाहणार असून आयओएच्या अस्थायी समितीची या प्रकरणी कोणतीही भूमिका असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
‘‘भारतीय बॉक्सिंगमधील कारभार पाहण्यासाठी आयओएने नियुक्त केलेली अस्थायी समिती यापुढे कोणतेही कामकाज पाहणार नाही. एआयबीएच्या सहकार्याने भारत तसेच परदेशातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी बॉक्सिंग इंडिया हीच राष्ट्रीय संघटना असणार आहे. बॉक्सिंग इंडियाने आयओएचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला असून लवकरच त्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियमांनुसार मान्यता देण्यात येईल,’’ असे एआयबीएच्या पत्रकात म्हटले आहे.
भारतीय बॉक्सिंग संघटनेवर ऑलिम्पिक बंदी असल्यामुळे आयओएने नियुक्त केलेली सहा सदस्यीय समिती भारतीय बॉक्सिंगमधील कारभार पाहत होती. एआयबीएच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुकीनंतर या नवीन संघटनेला एआयबीएकडून तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे. एआयबीएचे अध्यक्ष डॉ. चिंग-कुओ वू यांनी बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांना तात्पुरती मान्यता देण्यात आल्याचे पत्र पाठवले असून नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एआयबीएच्या सभेत बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी मान्यता देण्यात येईल, असे म्हटले आहे. बॉक्सिंग हा खेळ भारतात पारदर्शकपणे रुजवण्यासाठी डॉ. वू यांनी बॉक्सिंग इंडियाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना एका मार्गदर्शनपर शिबिरासाठी एआयबीएच्या मुख्यालयात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
भारतीय बॉक्सर्स तिरंग्याखाली उतरणार
मुंबई : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून (एआयबीए) बॉक्सिंग इंडियाला तात्पुरती मान्यता मिळाल्यानंतर आता आशियाई स्पर्धेत भारतीय बॉक्सर्स देशाच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्व करणार आहे. या घडामोडीमुळे, भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यास, देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. ‘‘आशियाई स्पर्धेत तिरंग्याखाली उतरण्यासाठी भारतीय बॉक्सर्सना परवानगी देण्यात आली आहे,’’ असे एआयबीएमधील भारताचे प्रतिनिधी किशन नरसी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International boxing association tells boxing india to take ioa membership
First published on: 17-09-2014 at 12:09 IST