ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या २७ खेळाडूंसह ५९ परदेशी खेळाडूंनी हॉकी इंडिया लीगसाठी होणाऱ्या पहिल्या लिलावात आपला सहभाग निश्चित केला आहे. हा लिलाव १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस व हॉकी इंडिया लीगचे अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, इंग्लंड, जर्मनी, इटली, आर्यलड, मलेशिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्पेन, भारत आदी देशांच्या खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. त्यामध्ये विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया व अर्जेन्टिनाच्या नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. हॉकी लीग स्पर्धा २३ जानेवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३१७ सामन्यांमध्ये भाग घेतलेला मलेशियाचा बचावरक्षक अझलान मिसरॉन याने लिलावाच्या करारावर सही केली आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धा (२०१०-कांस्यपदक), आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१०-रौप्यपदक) या स्पर्धाबरोबरच आशिया चषक व चॅम्पियन्स चषक स्पर्धामध्येही भाग घेतला आहे. चार वेळा ऑलिम्पिक, तीन वेळा विश्वचषक, सात वेळा चॅम्पियन्स, तीन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व करणारा जोंगहो सिहो याचा लीगमधील सहभाग निश्चित झाला आहे. त्याने तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक, तीन वेळा विश्वचषक, तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धा, तीन वेळा चॅम्पियन्स चषक स्पर्धामध्ये खेळलेल्या रियान आर्चिबाल्ड या न्यूझीलंडच्या खेळाडूने करारावर सह्य़ा केल्या आहेत.
इंग्लंडकडून २७५ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या बॅरी मिडलटोन याने लिलावाच्या करारावर सही केली आहे. त्याने तीन वेळा ऑलिम्पिक, दोन वेळा विश्वचषक, चार वेळा चॅम्पियन्स चषक स्पर्धामध्ये भाग घेतला आहे.
स्वाक्षरी केलेल्या खेळाडूंमध्ये स्पॅनिश बचावरक्षक रामोन अलेग्रे याचाही समावेश आहे. त्याने २३७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. जर्मनीच्या ऑलिव्हर कोर्न याच्या सहभागामुळे लीग स्पर्धा रंगतदार होईल अशी आशा आहे. त्याने २००८ व २०१२ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या जर्मनीचे प्रतिनिधित्व केले आहे.