भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) बैठकीला महासंघाचे अध्यक्ष अभयसिंह चौताला हे अपात्र असतानाही उपस्थित होते. अशा संघटकांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) थारा देऊ नये, असे क्लीन स्पोर्ट्स इंडिया संस्थेच्या अध्यक्षा व माजी आंतरराष्ट्रीय धावपटू अश्विनी नचप्पा यांनी म्हटले आहे.
आयओएच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेला भ्रष्टाचारी संघटकांना सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही चौताला हे अ‍ॅथलेटिक्सचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते, असा दावा नचप्पा यांनी केला आहे. भ्रष्टाचारी संघटकांना आयओएची निवडणूक लढविण्यास मनाई करण्याच्या भूमिकेबाबत आयओसीने ठाम राहावे, अशा आशयाचे पत्रही त्यांनी आयओसीला लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी अ‍ॅथलेटिक्सशी कसलाही संबंध नसतानाही चौताला हे अ‍ॅथलेटिक्सचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असल्याचे म्हटले आहे.