इंडियन प्रिमियर लीगमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनीला हटवण्याचा निर्णय हा थर्ड क्लास होता अशा शब्दात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाराजी व्यक्त केली आहे. धोनी हा भारतीय क्रिकेटमधील एक रत्नच आहे, त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय माझ्यासाठी संतापजनक होता असेही त्याने म्हटले आहे.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षात धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपद पटकावले आहे. संघमालक त्यांच्या पैशाने संघ चालवतात हे मान्य आहे. पण त्यांनी धोनीचे स्थान आणि त्याची विश्वासार्हता याचा विचार करणे अपेक्षित होते. हे सर्व मला चिड आणणारे आणि दुर्दैवी वाटत असल्याचे अझरुद्दीनने सांगितले.

रविवारी पुणे सुपरजायंट्सने धोनीला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला होता. धोनीने कर्णधारपदाचा त्याग केलेला नाही. आम्ही आगामी मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधारपदी निवड केली आहे. मागील हंगाम आमच्यासाठी समाधानकारक नव्हता. त्यामुळे दहाव्या हंगामासाठी एखाद्या युवा खेळाडूला कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला असे पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितले होते. पुणे संघाच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी झाल्याने आंतरराष्ट्रीय आणि लीग अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून धोनीच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीचा अस्त झाला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या पुणे संघाने मागील वर्षी १४ पैकी केवळ ५ सामने जिंकले होते. मागील वर्षी गुणतालिकेवर पुणे संघ सातव्या क्रमांकावर होता. त्यामुळेच नाराज होऊन संघ व्यवस्थापनाने धोनीची हकालपट्टी केल्याची चर्चा आहे.