IPL 2019 हा क्रिकेट महोत्सव सध्या भारतात सुरु आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. १२ मे रोजी या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. मंगळवारी चेन्नईविरुद्ध झालेला सामना जिंकून मुंबईने अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. तर बुधवारी झालेल्या सामन्यात विजेता ठरलेला दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचा विजेता हा अंतिम सामन्यातील दुसरा संघ असणार आहे. या हंगामात अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखवली. या कामगिरीच्या बळावर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने आपली ‘ड्रीम टीम’ जाहीर केली असून त्यात विराट कोहली, रोहित शर्मा यांना स्थान मिळालेले नाही.

सलामीवीर म्हणून अनिल कुंबळेने डेव्हिड वॉर्नर आणि लोकेश राहुल या दोघांची निवड केली आहे. डेव्हिड वॉर्नरने अंदाजे ७०० धावा केल्या आहेत. तर राहुलनेदेखील ६०० धावांच्या आसपास टप्पा गाठला आहे. मधल्या फळीत कुंबळेने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याची निवड केली आहे. त्याच्याबरोबर महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत याला मधल्या फळीतील खेळाडू म्हणून निवडले आहे. या तीनही खेळाडूंनी आपल्या संघांना उत्तम कामगिरी करून विजय मिळवून दिला आहे.

भारताच्या संघात सध्या अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. पण कुंबळेने एक भारतीय आणि एक परदेशी खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडला आहे. यात विंडीजचा तुफानी खेळाडू आंद्रे रसल याचा समावेश आहे. रसलने यंदाच्या हंगामात षटकरांचा पाऊस पाडला. त्याने ५० हून अधिक षटकार खेचले. याबरोबर कुंबळेने हार्दिक पांड्यालादेखील संघात समाविष्ट करून घेतले आहे.

गोलंदाजांमध्ये त्याने इम्रान ताहीर आणि कागिसो रबाडा यांना पसंती दर्शवली आहे. इम्रान ताहीरने यंदाच्या हंगामात फिरकीचा प्रभाव पाडला असून चेन्नईसाठी उत्तम कामगिरी केली आहे. तर कागिसो रबाडा याने कोलकाता विरुद्धची सुपर ओव्हर गाजवली होती. तसेच त्याने पूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली आहे. याबरोबर त्याने २ भारतीय गोलंदाजांचीही निवड केली आहे. जसप्रीत बुमराह याची निवड अपेक्षितच धरली जात होती. कारण त्याने उत्तम कामगिरी केली आहे. पण या सोबत कुंबळेने श्रेयस गोपाळला संघात पसंती दिली आहे.

कुंबळेची ड्रीम टीम –

सलामीवीर – डेव्हिड वॉर्नर, लोकेश राहुल

मधली फळी – श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी

अष्टपैलू खेळाडू – आंद्रे रसल, हार्दिक पांड्या

गोलंदाज – इम्रान ताहीर, श्रेयस गोपाळ, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह