कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा अफलातून व्यक्ती आहे. खेळाडूंशी फारशी चर्चा न करतादेखील तो संघाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात वाकबगार आहे, अशा शब्दात चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहिर याने धोनीची स्तुती केली.

७५ धावांची दमदार खेळी करतानाच कर्णधार म्हणून वेगळे डावपेच रचत धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला आठ धावांनी विजय मिळवून दिल्यानंतर ताहिर बोलत होता. ‘‘तो ज्याप्रकारे संघाच्या गरजेनुरूप स्वत:चा वापर करतो, ते अविश्वसनीय असते. संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठीदेखील तो कधीच संघसहकाऱ्यांशी फार बोलत नाही. मात्र तरीही तो संघाला सतत प्रेरणा देत राहतो. प्रभावी नेता आणि माणूस म्हणूनदेखील धोनी हा खूप महान आहे,’’ असेही ताहिरने सांगितले. ‘‘धोनीला सर्वोत्तम फिनिशर का मानले जाते, ते त्याने अन्य अनेक सामन्यांप्रमाणे राजस्थानविरुद्धच्या सामन्यातदेखील दाखवून दिले आहे. तसेच डायने ब्राव्होनेदेखील शेवटचे षटक अत्यंत प्रभावीपणे टाकून सामन्यातील विजय निश्चित केला,’’ असेही ताहिरने नमूद केले.

चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर 8 धावांनी मात केली. अखेरच्या षटकात विजयासाठी 12 धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

176 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीत त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यानंतर आर्चर-स्टोक्स जोडीने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स माघारी परतल्याने राजस्थानच्या आशेवर पाणी फिरलं. ब्राव्होने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाची विजयी परंपरा कायम राखली.

त्याआधी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर खेळत असताना आश्वासक धावसंख्या उभी केली. चांगली सुरुवात झालेली नसतानाही, धोनीने आधी सुरेश रैना आणि नंतर ब्राव्होच्या मदतीने संघाला 150 धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. 20 षटकात चेन्नईचा संघ 175 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

अंबाती रायुडू, शेन वॉटसन आणि केदार जाधव हे 3 फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या या कामगिरीमुळे चेन्नईची अवस्था काही क्षणांसाठी 27/3 अशी झाली होती. यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी जोडीने संघाचा डाव सावरला.

या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईने आश्वासक धावसंख्या गाठली. जयदेव उनाडकटने रैनाचा त्रिफळा उडवत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. यानंतर रैनाने ब्राव्होच्या मदतीने संघाची बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. धोनीने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याला अखेरच्या षटकात ब्राव्होनेही चांगली साथ दिली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले. त्याला बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.