IPL 2019 KKR vs DC : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर दिल्लीने कोलकाताचा पराभव केला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ गडी आणि ७ चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. हा सामना पाहण्यासाठी शाहरुख स्वतः स्टेडियममध्ये हजर होता. पण त्याला आपल्या संघाचा विजय अनुभवता आला नाही. पण त्या पराभवातही त्याने एक समाधानाची बाब शोधून काढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुखने सामना संपल्यानंतर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये शाहरुखने शुभमन गिल आणि आंद्रे रसल यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. मात्र याबरोबरच पराभवातून त्याने एक समाधानाची बाब शोधून काढली. सौरव गांगुली हा ‘कोलकाताचा वाघ’ म्हणून ओळखला जातो. पण तो दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक स्टाफ आहे. त्यामुळे किमान ईडन गार्डन्सवर गांगुली तरी विजयी संघाच्या बाजूने आहे याचे समाधान आहे, असे शाहरुखने त्याच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १४ धावा केल्या. त्यात २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ ६ धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. शिखर धवनच्या साथीने खेळत ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४६ धावा करून बाद झाला. पण शिखर धवन ९७ धावा करून नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि २ षटकार खेचले. तर कॉलिन इन्ग्रॅमने (१४*) विजयी षटकार लगावला.

त्या आधी, कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या.

शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत ४५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला.शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या ६ चेंडूत १४ धावांच्या जोरावर कोलकाताने १७८ धावांपर्यंत मजल मारली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kkr vs dc kolkata knight riders lost game but srk shahrukh feels positive as sourav ganguly was at winning side
First published on: 13-04-2019 at 13:59 IST