आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइटराइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईचा संघ मागच्या सामन्यात रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या व्यतिरिक्त खेळला होता. दुखापतीमुळे या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अजूनही शंका आहे. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्मा या सामन्यात खेळेल असे संकेत दिले होते. मुंबईने चेन्नईविरुद्धचा सामना २० धावांनी गमावला होता. तर कोलकाताने दुसऱ्या टप्प्यात दमदार पुनरागमन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील गुणतालिकेत ८ गुणांसह मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कोलकाताने स्पर्धेत ८ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. यापैकी ३ सामन्यात विजय, तर ५ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे सहा गुणांसह कोलकाता ६ व्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याची कोलकात्याची धडपड असणार आहे.

मुंबई आणि कोलकाता संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २२ सामन्यात मुंबईने, तर ६ सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे. २०२० मध्ये आबुधाबीत झालेल्या स्पर्धेत एकूण ३ सामने पार पडले होते. त्यापैकी २ सामन्यात मुंबईत, तर एका सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे.

संभावित ११ खेळाडूंचा संघ
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दीक पांड्या, एडम मिल्ने, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा
कोलकाता नाइटराइडर्स: इऑन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती