नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या हंगामातील यशानंतर आता दुसऱ्या हंगामापासून या लीगचेही सामने ‘होम आणि अवे’ पद्धतीने खेळवण्यात येतील. म्हणजेच संघांना घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानांवर सामने खेळावे लागतील. संघांची संख्या मात्र पाचच असेल, अशी माहिती इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी दिली.

‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या पर्वाला चाहते आणि खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या पर्वातील सर्व सामने केवळ मुंबईतील दोन केंद्रांवर खेळवण्यात आले. मात्र, चाहत्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने पुढील वर्षीपासून महिला लीगमधील सामनेही ‘होम आणि अवे’ पद्धतीने खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे धुमल यांनी सांगितले.

‘‘सुरुवात चांगली झाली आहे. आम्हाला अपेक्षित होता त्यापेक्षा अधिक प्रतिसाद महिला प्रीमियर लीगला मिळाला. आम्ही पाच संघांसह लीग सुरू केली आहे. महिला लीगमध्ये संघ वाढविण्यासाठी आम्हाला वाव आहे. पण, सध्या तरी तसा विचार नाही. तीन हंगाम तरी पाचच संघांसह खेळले जातील. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम लक्षात घेऊन लीगची आखणी केली जाईल,’’ असे धुमल म्हणाले.

‘‘चाहत्यांना अधिक बांधून ठेवण्यासाठी ‘होम आणि अवे’ पद्धतीची आवश्यकता होती. महिला लीग सुरू करण्यासाठी पहिल्या वर्षी आम्हाला मर्यादित वेळ मिळाला होता. त्यानंतरही ज्या प्रकारे ही स्पर्धा पार पडली त्याबाबत आम्ही समाधानी आहोत,’’ असेही धुमल यांनी सांगितले. ‘‘महिला क्रिकेटमध्ये अजूनही दर्जेदार खेळाडूंच्या उपलब्धतेचा अभाव आहे. पहिल्या पर्वात क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. अननुभवी खेळाडूंना फारशी छाप पाडता आली नाही. भविष्यात महिला खेळाडू कशा पद्धतीने पुढे येतात त्यावर लीगमधील संघांची संख्या वाढविण्याचा विचार केला जाईल,’’ असे धुमल यांनी स्पष्ट केले.