IPLच्या गेल्या १२ हंगामात अतिशय समतोल असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदाच्या हंगामात धक्कादायकरित्या सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर शेवटच्या षटकात विजय मिळवला. त्या सामन्यात अंबाती रायडूने महत्त्वाची भूमिका बजावली. पण नंतर राजस्थान आणि दिल्ली या तुलनेने दुबळ्या संघांनी चेन्नई पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले. अंबाती रायडू दुखपातीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी प्रथम फलंदाजी करत चेन्नईला विजयासाठी मोठं आव्हान दिलं.

शेवटच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी आणि आव्हानाचा पाठलाग करताना धावगती आवाक्यात राखत डाव पुढे नेणारी फलंदाजी यांच्या अभावामुळे CSKचा पराभव झाला. राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही सामन्यात चेन्नईला संघाबाहेर असलेला ड्वेन ब्राव्हो आणि अंबाती रायडू या खेळाडूंची उणीव प्रकर्षाने जाणवली. हे दोन खेळाडू संघात कधी परतणार? असा सवाल चाहत्यांनाकडून सातत्याने विचारण्यात येत आहे. त्याचे उत्तर CSKचे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पोर्ट्सस्टारशी बोलताना दिले.

“रायडू स्नायूंच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा झाला आहे. तो पुढच्या (हैदराबादविरूद्धच्या) सामन्यात संघात दिसेल. रायडूने प्रशिक्षण सत्रात धावण्याचा सराव केला. तसेच त्याने नेट्समध्ये बिनदिक्कत फलंदाजीचाही सराव केला. ब्राव्होदेखील नेट्समध्ये उत्तम गोलंदाजी करतो आहे. मला विश्वास आहे की चेन्नईचा संघ लवकरच दमदार पुनरागमन करेल”, असे विश्वनाथन म्हणाले.