आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची कामगिरी फारशी आश्वासक झालेली नाही. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेला पंजाबचा संघ चांगली कामगिरी करुन पहिल्या ४ स्थानांवर येण्यासाठी धडपडतो आहे. वास्तविक पाहता लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी असे महत्वाचे खेळाडू यंदा चांगल्या फॉर्मात आहे, परंतू ऐनवेळी संघाची गाडी रुळावरुन घसरते आहे. ख्रिस गेलसारखा धडाकेबाज फलंदाज संघात असतानाही पंजाबने त्याला आतापर्यंत संघात संधी दिलेली नाही. पंजाबच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेवर यासाठी सोशल मीडियावर टीकाही झाली. परंतू संघाची खराब कामगिरी पाहता पंजाबचं संघ व्यवस्थापन ख्रिस गेल आणि मुजीब झरदान यांना आगामी सामन्यांत संधी देण्याच्या विचारात आहे.
अवश्य वाचा – फक्त दोन ओळींमध्ये डोकं गरगरलं?? पूर्ण पुस्तक वाचायला गेलो तर चक्कर येईल !
पंजाबच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वासिम जाफरने पीटीआयशी बोलताना याबद्दल माहिती दिली. “लवकरच त्यांना संधी मिळेल. मी याआधीही बोललो होतो की आता नाहीतर थोड्या दिवसांनी या खेळाडूंना संधी मिळणारच होती. जिकडे प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं अशा स्थितीत आम्हाला या खेळाडूंना मैदानात उतरवायचं नव्हतं. त्यामुळे लवकरच हे खेळाडू संघात दिसतील अशी आशा आहे.” आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकांत गोलंदाजांची खराब कामगिरी हा पंजाबसाठी चिंतेचा विषय ठरतो आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : तुमच्यासाठी हीच जागा योग्य ! माजी खेळाडूने सुनावले पंजाबला खडे बोल
ख्रिस गेल आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नेट्समध्ये चांगला सराव करतो आहे. तो सामन्याचं चित्र पालटू शकतो हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ख्रिस गेल यंदा आपल्या फॉर्मात येऊन पंजाबला विजय मिळवून देईल अशी आशा पंजाबला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत ख्रिस गेल पंजाबच्या संघाकडून खेळताना दिसतो का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.