दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या फॉफ डू प्लेसिसने एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या २०११च्या विश्वचषकातील पराभवानंतर मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे डू प्लेसिसने सांगितले. २०११च्या विश्वचषकात क्वार्टर फायनलमध्ये २२२ धावांचे लक्ष्य असूनही दक्षिण आफ्रिका संघ न्यूझीलंडकडून ४९ धावांनी पराभूत झाला होता.

या सामन्याद्वारे कारकिर्दीतील दहावा सामना खेळत असलेला डू प्लेसिस जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने १२१ धावा देऊन चार विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी एबी डिव्हिलियर्स ३५ धावांवर फलंदाजी करत होता. डू प्लेसिस त्याला साथ देण्यासाठी आला. मात्र, डिव्हिलियर्स धावबाद झाला.

 

डू प्लेसिसने क्रिकइन्फोला सांगितले, “त्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. माझ्या पत्नीला मृत्यूची धमकी मिळत होती. सोशल मीडियावर खूप खासगी पद्धतीने टीका करण्यात आली. काही आक्षेपार्ह गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या, ज्याचा मी येथे उल्लेख करू शकत नाही. संघाच्या सर्व खेळाडूंना अशाच गोष्टींचा सामना करावा लागला.”

कसोटीतून निवृत्ती

डू प्लेसिस हे २०१६ ते २०२१ पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता. यंदा फेब्रुवारीत डू प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. देशासाठी त्याने ६९ कसोटी सामने खेळले आहेत.या कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४१६३ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याने ११८ डावात १० शतके आणि २१ अर्धशतकेही झळकावली आहे.