Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy: आयपीएल २०२४ हा हंगाम अटीतटीच्या सामान्यांपेक्षा रोहित व हार्दिक यांच्यावरून चालू असलेल्या वादामुळेच जास्त चर्चेत आला आहे. खरंतर आयपीएलच्या सुरुवातीला कर्णधारपदाचा मोठा बदल हा दोन संघांमध्ये झाला, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. दोन्ही संघ हे आयपीएलच्या इतिहासातील शक्तिशाली संघ आहेत, दोघांचे माजी कर्णधार म्हणजेच रोहित शर्मा व महेंद्र सिंग धोनी यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. असं असूनही जेव्हा धोनीच्या हातातील कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं गेलं तेव्हा चाहत्यांनी हा बदल खूप सहज स्वीकारला पण त्याविरुद्ध जेव्हा रोहितची कॅप्टन्सी हार्दिककडे गेली तेव्हा सोशल मीडियापासून ते स्टेडियमपर्यंत संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. हा फरक साहजिकच मैदानातील काही कृतींमुळेही असू शकतो पण सध्या हार्दिकला ट्रोल करण्यासाठी चाहत्यांनी सर्व सीमा ओलांडल्याचं दिसतंय, असं आम्ही नाही तर पाकिस्तानी माजी खेळाडू वसीम अक्रमने अलीकडेच एका शोमध्ये म्हटलंय.

‘भारतातील ही समस्या आहे…’

अक्रमने स्पोर्ट्सकीडावर आयोजित मॅच की बात या कार्यक्रमात अलीकडेच हजेरी लावली होती तेव्हा तो म्हणाला की, “भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात हीच समस्या आहे. आपण गोष्टी विसरून पुढे जातच नाही. आता आपण मुलांना पण सांगू की पंड्याचा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला पण तुम्ही ही आठवण करून देत राहायला हवी की त्याचा बाबा २० वर्षांपूर्वी कर्णधार का झाला? खेळाडूंवरचं प्रेम वगैरे ठीक आहे पण चाहत्यांनी आता थोडं शांत व्हायला हवं. काहीही झालं तरी तू तुमचा खेळाडू आहे, तुमच्या मुंबई इंडियन्सकडून खेळतो, भारताकडून खेळतो आणि तो तुम्हाला जिंकवू शकतो, अशावेळी स्वतःच्या खेळाडूला वेठीस धरण्यात काही अर्थ नाही, वाटल्यास थोडी टीका करू शकता पण त्यानंतर विषय सोडून पुढे जा.”

IPL 2024 मध्ये हार्दिकची कामगिरी कशी आहे?

पंड्याला गुजरात, हैद्राबाद आणि मुंबईतील आयपीएल चाहत्यांकडून जोरदार टीका सहन करावी लागली आहे. पंड्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने आठ सामन्यांत तीन विजय आणि पाच पराभवांची नोंद केली आहे. १० संघांच्या IPL क्रमवारीत मुंबई इंडियन्स आठव्या स्थानावर आहे. एकेकाळी टीम इंडियामध्ये रोहितचा उत्तराधिकारी म्हणून ओळखला जाणारा हार्दिक या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी एकेरी मॅच-विनिंग कामगिरी नोंदवण्यात अपयशी ठरला आहे.

“रोहितने कर्णधारपद कायम ठेवायला हवे होते”

हार्दिक पंड्याची कामगिरी पाहता विश्वचषक स्पर्धेच्या या वर्षात रोहितने एमआयचे कर्णधारपद सुद्धा कायम ठेवायला हवे होते, असे अक्रमने म्हटले. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. सीएसकेने दीर्घ काळासाठी कर्णधारपदाचा निर्णय कसा घेतला ते पहा, कदाचित मुंबई इंडियन्सचा सुद्धा हाच प्लॅन होता पण तो अवलंबता आला नाही. माझ्या मते रोहित शर्माने आणखी एक वर्ष कर्णधारपद सांभाळायला हवे होते. कदाचित पुढच्या वर्षी हार्दिक पंड्या कर्णधार होऊ शकला असता.”