मुंबई इंडिन्सनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक चाहत्यांची पसंती मिळालेला संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे संपूर्ण देशभरात चाहते आहेत. परंतू आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी बनला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर राजस्थान आणि दिल्ली या दोन संघांकडून चेन्नईला हार पत्करावी लागली. दोन्ही सामन्यांत धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे चेन्नईचे चाहतेही नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनीही धोनीच्या नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. दिल्लीविरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने धोनीला उपरोधिक टोला लगावला आहे.
“दिल्लीविरुद्ध सामन्याच चेन्नईची सुरुवात फार खराब झाली नव्हती. पण सामन्यात चेन्नईचे खेळाडू सातत्याने दुसऱ्या गिअरवर असल्याचं जाणवत होतं. आपण टी-२० क्रिकेट खेळतोय हे मुरली विजयला बहुतेक ठावूक नसावं. शेन वॉटसन हा एका जुन्या इंजिनासारखा खेळतोय, त्याला सुरु व्हायला वेळ लागतो आणि तो लवकरच बंद पडतो. फाफ डु-प्लेसिस मैदानात आल्यानंतर तो इतर खेळाडूंना असं सांगताना वाटतो की आपण कसोटी नाही टी-२० खेळतोय. आता धोनीऐवजी भारतात बुलेट ट्रेन येईल पण धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार नाही.” आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर धोनी चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्याचं विश्लेषण करत होता.
राजस्थानविरुद्ध सामन्यात चेन्नईला १६ धावांनी तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सुरेश रैना-हरभजन सिंह या महत्वाच्या खेळाडूंनी माघार घेतल्याचा चेन्नईला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगलाच फटका बसताना दिसतो आहे. त्यातच अंबाती रायुडूही दोन्ही सामन्यांत खेळू शकला नाही ज्यामुळे चेन्नईची फलंदाजीत कोलमडली. २ ऑक्टोबरला चेन्नईचा पुढचा सामना हैदराबादविरुद्ध असेल…या सामन्यात धोनी आणि चेन्नईचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.