राजस्थान विरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५०पार मजल मारली. मनिष पांडेचे अर्धशतक (५४) आणि वॉर्नरची ४८ धावांची खेळी याच्या बळावर हैदराबादने निर्धारित षटकांत ४ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिघांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत १-१ बळी टिपला. या त्रिकुटाला श्रेयस गोपालने गोलंदाजीत चांगली साथ दिली. पण दीर्घ विश्रांतीनंतर संघात कमबॅक करणारा बेन स्टोक्स मात्र सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला.

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना स्टोक्सने दौऱ्यातून माघार घेतली होती. त्याच्या वडिलांना मेंदूचा कर्करोग असल्याचे निदान झाल्याने तो न्यूझीलंडला रवाना झाला होता. गेले २ महिने तो न्यूझीलंडमध्ये त्याच्या कुटुंबासोबत होता. काही दिवसांपूर्वी तो दुबईत आला आणि क्वारंटाइन संपवून तो आज संघात दाखल झाला. पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीत त्याला फक्त १ षटक टाकायला मिळालं. त्यात त्याने ७ धावा देत एकही बळी घेतला नाही. तर फलंदाजीत त्याला सलामीला संधी मिळाली, पण खलील अहमदच्या गोलंदाजीवर तो अवघ्या ५ धावांत माघारी परतला.

दरम्यान, IPLमध्ये यंदाच्या हंगामाचा धडाक्यात प्रारंभ केल्यानंतर सलग चार पराभव पत्करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला बेन स्टोक्सकडून अपेक्षा होत्या. पण सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो अपयशी ठरला.