आयपीएलच्या तेराव्या हंगामात लागोपाठ तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने दमदार पुनरागमन केलं आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात १० गडी राखून विजय मिळवल्यानंतर चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. KKR ला १६७ धावांवर रोखण्याच चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले आहे. मोक्याच्या क्षणी KKR ची जमलेली जोडी फोडण्यात यशस्वी झालेल्या चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यात दमदार पुनरागमन करत KKR ला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही.

ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, सॅम करन, कर्ण शर्मा या सर्व गोलंदाजांनी KKR च्या धावगतीला अंकुश लावला. गोलंदाजांच्या या प्रयत्नाला चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनीही तितकीच चांगली साथ दिली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनिल नारायणला KKR ने यंदा चौथ्या स्थानावर पाठवलं. काही सुरेख फटके खेळत नारायणने चांगली सुरुवातही केली. परंतू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला. रविंद्र जाडेजाने धावून जात नारायणचा सुरेख झेल पकडला. परंतू झेल पकडल्यानंतर फॉलो-थ्रूमध्ये आपण सीमारेषा ओलांडत आहोत याचा अंदाज येताच जाडेजाने डु-प्लेसिसकडे झेल देत नारायण बाद होईल याकडे लक्ष दिलं. पाहा हा व्हिडीओ…

सलामीवीर राहुल त्रिपाठीचा अपवाद वगळता KKR चा एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. राहुल त्रिपाठीने ५१ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.