आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार झालेली असताना हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. निर्धारित षटकांत पंजाबचा संघ १२६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. नाणेफेक जिंकत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने आज दुखापतग्रस्त मयांक अग्रवालच्या जागी मनदीप सिंहला संघात स्थान दिलं. मयांक नसताना ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत सलामीला येईल अशी सर्वांना आशा होती, परंतू पंजाबने युवा मनदीप सिंहला राहुलसोबत संधी दिली.
युवा मनदीपसाठी आजचा सामना सोपा नव्हता. शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचं निधन झालं. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला निघण्याआधीच मनदीपच्या वडिलांची तब्येत खराब होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Lost his father last night, but Mandy’s out here to open!
Way to go, Mandy#SaddaPunjab #IPL2020 #KXIP #KXIPvSRH
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) October 24, 2020
दरम्यान मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. मनदीप संदीप शर्माचा आयपीएलच्या इतिहासातला १०० वा बळी ठरला. पंजाबच्या इतर फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. निकोल पूरनने अखेरपर्यंत लढा देऊन संघाला १२६ धावांचा टप्पा गाठून दिला.