IPL 2020 स्पर्धा सध्या जोरदार चर्चेत आहे. भारतातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता BCCIने स्पर्धा UAEला हलवण्याचा निर्णय घेतला. तिथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जवळपास सर्व संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी संपवला असून सराव शिबिरांना सुरूवात झाली आहे. पण CSKसंघ मात्र अद्याप क्वारंटाइन आहे. त्यांच्या ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि दोन खेळाडू करोनाग्रस्त झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांना आणखी एक आठवडा क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोमवारी (३१ ऑगस्ट) झालेल्या करोना चाचण्यांमध्ये CSKच्या साऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. पण तशातच आता BCCIच्या कर्मचाऱ्यांच्या गटातील एकाला करोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, BCCIने युएईमध्ये पाठवलेल्या वैद्यकीय समितीतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यालाच करोनाची लागण झाली असल्याचे बीसीसीआयच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं आहे. CSKचे १३ जण करोनाग्रस्त झाल्यानंतर लगेचच BCCIचा अधिकारी करोनाग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कार्यरत असणाऱ्या दोघांनादेखील करोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी एनएनआयशी बोलताना सांगितले आहे.

“वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे वृत्त खरं आहे पण घाबरण्याचं कारण नाही. त्यांना करोनाची लक्षण नाहीत. ते विलगीकरण कक्षात आहेत. ते कोणत्याही इतर खेळाडू किंवा कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले नाहीत. भारत-युएई प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत आणि पुढील चाचणीपर्यंत तंदुरूस्त होतील अशी आशा आहे. NCAच्या दोघांनाही करोनाची लागण झाली असून त्यांनादेखील विलगीकरणात ठेवण्यात आले आहे”, असे BCCIच्या सूत्रांनी सांगितलं.