आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र सुरुच आहे. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सनराईजर्स हैदराबाद संघासमोर आणखी एक संकट निर्माण झालं आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही.

सनराईजर्स हैदराबाद संघाने भुवनेश्वर कुमारच्या जागेवर पृथ्वी राज यारा या गोलंदाजाला संघात स्थान दिलं आहे. पृथ्वी राज यारा ने आतापर्यंत एकही आयपीएलचा हंगाम खेळलेला नाही. परंतू अ श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. या जोरावरच त्याला हैदराबाद संघात स्थान देण्यात आलंय.

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना संघातील सूत्रांनी भुवनेश्वरच्या माघार घेण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका नक्कीच बसणार आहे. परंतू संघ यामधून नक्कीच सावरेल.” चेन्नईविरुद्ध सामन्यात दुखापत झाल्यानंतर मुंबईविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर खेळू शकला नाही.