भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आधी चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. त्यानंतर रैनाने IPL 2020मधून माघार घेतली. दोन दिवसांनी त्याच्या माघारीचं कारण वादग्रस्त असल्याचं समोर आलं. तर काल (१ सप्टेंबर) रैनाने पंजाब पोलिसांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून त्याच्या काकांच्या कुटुंबाबत झालेल्या प्रकरणाबाबत मदत मागितली. त्यातच महत्त्वाचे म्हणजे त्या ट्विटवर चेन्नईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याला ‘खचून जाऊ नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत’, असा संदेश देण्यात आला. त्यानंतर आता रैनाने CSKबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

“CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासाठी माघारीचा निर्णय खूप कठीण होता. पण माझ्यात आणि CSKमध्ये कोणताही वादविवाद नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी सध्या इथे क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असे रैनाने क्रीकबझशी बोलताना सांगितलं.

“माघार घेण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मला माझ्या कुटुंबासाठी परत येणं गरजेचं होतं. त्यावेळी मला माझ्या कुटुंबीयांसोबत घरी असणं क्रमप्राप्त होतं. एखादं महत्त्वाचं कारण असल्याशिवाय कोणी १२.५० कोटींचा करार मागे सोडून माघारी परतत नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी मी अद्याप तंदुरूस्त आहे. IPLमध्ये CSKसाठी मी अजून चार ते पाच वर्षे नक्की खेळणार आहे”, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबीयांवरील हल्ल्याची घटना मन सुन्न करणारी!

पठाणकोटमधील घटना खूप भयानक होती. घरातील साऱ्यांसाठी तो मन सुन्न करणारा प्रकार होता. घरी येऊन साऱ्यांना धक्क्यातून सावरण्यासाठी धीर देणं ही माझी जबाबदारी होती. मी भारतात परतल्यापासून मला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे मी अजून माझ्या आत्याला आणि कुटंबीयांना भेटूही शकलेलो नाही, असे रैनाने सांगितलं.