चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये परतला आहे. रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ९९ धावा केल्या आणि डेव्हन कॉनवेच्या साथीने पहिल्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. गायकवाड आणि कॉनवे यांनी फॅफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांचा विक्रम मोडला.

वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी २०२० च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध पहिल्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली. तर चेन्नईच्या कॉनवे ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद परतला. गेल्या मोसमात गायकवाड आणि फॅफ डू प्लेसिस यांनी चेन्नईसाठी डावाची सुरुवात केली होती. या हंगामात डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करत आहे.

भागीदारीचा विक्रम मोडल्यानंतर गायकवाडने सीएसकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “हा विक्रम करताना खूप छान वाटत आहे. आम्हाला त्याची अपेक्षा नव्हती. आम्हाला फक्त संघाला चांगली सुरुवात करायची होती. मला वाटतं डु प्लेसिसला माझा थोडा हेवा वाटत असावा.”

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २०२ धावा केल्या. अशा स्थितीत २०३ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकात सहा गडी गमावून १८९ धावा करता आल्या आणि त्यांनी सामना १३ धावांनी गमावला. सनरायझर्स हैदराबादला पहिला झटका अभिषेक शर्माच्या रूपाने बसला. अभिषेक शर्मा २४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. राहुल त्रिपाठीला खातेही उघडता आले नाही. तर एडन मार्क्रम १७ धावा करून बाद झाला. कर्णधार केन विल्यमसन ४७ धावा करून बाद झाला. शशांक सिंग १५ आणि वॉशिंग्टन सुंदरने दोन धावा करून बाद झाले. निकोलस पूरन ६४ धावांवर नाबाद परतला होता.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत ऋतुराज गायकवाडने ९९ धावा केल्या आणि कॉनवेने नाबाद ८५ धावा केल्या. गायकवाडचे मोसमातील पहिले शतक एका धावेने हुकले आणि टी नटराजनने त्याला बाद केले. चेन्नईला दुसरा धक्काही धोनीच्या रूपाने नटराजनने दिला. चेन्नईने २० षटकांत दोन गडी गमावून २०२ धावा केल्या होत्या.