IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांमध्ये धोनीची वादळी फलंदाजी कायम आहे. धोनी अखेरच्या षटकांमध्ये मैदानावर येणार म्हणजे गोलंदाजांची धुलाई होणार हे जणू निश्चित झालंय. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीला आलेल्या धोनीने पुन्हा एकदा अशीच विस्फोटक फलंदाजी केली. धोनीने २८ धावांच्या खेळीमध्ये एक असा षटकार ठोकला जो त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत क्वचितच कोणी पाहिला असेल. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डावाच्या १७व्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने एकेरी धाव घेत आपले खाते उघडले आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढच्याच चेंडूवर त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच असा शॉट खेळला, जो पाहून एकना स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येकाने एकच जल्लोष केला.
डावाचे १९वे षटक टाकणाऱ्या मोहसिन खानच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट सोडून डाव्या बाजूला जात यष्टीच्या मागे षटकार लगावला. मोहसिनच्या या शॉर्ट लेन्थ बॉलवर धोनीने ऑफ साईडला जाऊन यष्टिरक्षक केएल राहुलच्या डोक्यावरून एक असा फटका लगावला जो थेट षटकारासाठी गेला. धोनीने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत क्वचितच असा शॉट खेळला असेल. हा शॉट पाहून फक्त चाहतेच नाही तर कॉमेंटेटर यांनीही धोनीच्या या शॉटची प्रशंसा केली आणि त्यांनी धोनीने असा शॉट पहिल्यांदाच खेळला असल्याचा उल्लेख केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
माहीने या सामन्यात ३११ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने स्फोटक फलंदाजी करत केवळ ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. तर धोनीने त्याच्या या षटकारांच्या पावसामध्ये १०१ मीटर लांब षटकार लगावला. चेन्नई सुपर किंग्सने आजच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिल २००८ रोजी आयपीएलमधील पहिला सामना जिंकला होता. याच खास दिवशी धोनीने शानदार फटकेबाजी करत हा दिवस अधिक संस्मरणीय केला आहे.
धोनीच्या या शानदार फटकेबाजीच्या जोरावर झटपट विकेट गमावलेल्या चेन्नईने ६ बाद १७६ धावा केल्या. जडेजाची ५७ धावांची खेळी, मोईन अलीच्या ३० धावा आणि रहाणेच्या ३६ धावांच्या खेळीने संघाला १०० धावांचा आकडा गाठण्यात मदत केली. याशिवाय इतर कोणत्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. संघाने सुरूवातीला झटपट विकेट्स गमावल्याने संघ १५० धावांपर्यंत क्वचितच पोहोचेल असे वाटले होते. पण धोनीने पुन्हा एकदा अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली.