आपण आता आयपीएलच्या मध्यावर आलो आहोत. प्रत्येक संघाचे निम्मे सामने झालेत. काही गोष्टींचे आडाखे बांधायला हरकत नाही इतपत क्रिकेट खेळलं गेले आहे. कोण फॉर्ममध्ये आहे आणि कोण नाही हे लक्षात येतंय. अजिंक्य संघ कोणता असेल याचा विचार करताना ज्या संघात गेम ब्रेकर्स आणि गेम चेंजर्स आहेत ते संघ पटकन डोळय़ांसमोर येतात.
गेम ब्रेकर्स म्हणजे असे खेळाडू की जे पाच ते सहा ओव्हर्समध्ये सामन्याचा निकाल ठरवून टाकतात. ते असं आक्रमण करतात, की विरोधी संघ सूत्रं हाती घेण्याआधीच राजीनामा देऊन टाकतो. आता काहीही झालं तरी सामन्यात आपण प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणार या कटू सत्याला विरोधी संघ शरण जातो. असे गेम ब्रेकर्स संघात असणं म्हणजे ड्रोन विमानांचा ताफा बाळगण्यासारखं असतं. लढाई जिंकल्यात जमा. या आयपीएलमध्ये असे चार खेळाडू डोळय़ांत भरतात. ख्रिस गेल त्यात पहिला. त्याच्यासाठी षटकार मारणं म्हणजे टॉसकरिता नाणं उडवण्याइतकं सोपं आहे. जो मनुष्य २० ओव्हर्सच्या मॅचमध्ये एकटा १७५ रन्स चोपतो तो गेम ब्रेकरच नाही तर गेम डिस्ट्रॉयर ठरतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं सातत्य. दर दोन सामन्यांमागे तो छप्पर पाडणारा एक डाव खेळतो. मला याचं नवल वाटतं, की त्याचे फटके फारसे मिसटाइम होत नाहीत. सगळे आरपार जातात. त्याच्यामुळे बंगलोर उपांत्यफेरी सहज गाठेल. मुंबईचा पोलार्डसुद्धा गेम ब्रेकर. फक्त त्याचं कार्यक्षेत्र म्हणजे शेवटच्या पाच ओव्हर्स. पाच ओव्हर्समध्ये पाहता पाहता सत्तर-पंचाहत्तर रन्सचा पाऊस पडतो आणि प्रतिस्पर्ध्याला सामना भुर्रकन उडून गेल्याचं लक्षात येतं. तिसरा गेम ब्रेकर म्हणजे राजस्थानचा शेन वॉटसन. तो पण लग्नाच्या पंक्तीत पैजेवर जिलब्या खाव्या तसे कितीही षटकार मारू शकतो. उरलेल्या सामन्यांमध्ये आपल्या खेळाचा आलेख वर नेण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. चौथा गेम ब्रेकर हळूहळू क्षितिजावर उगवतोय. मुंबईनं ड्वेन स्मिथ नावाची तलवार म्यानातून बाहेर काढली आणि ती तळपायाला लागली. मुष्टियोद्धय़ाची पिळदार शरीरयष्टी असलेला हा खेळाडू मुंबईच्या अनेक विजयांचं तोरण बांधतोय. पोलार्ड तारणहार असला, तर स्मिथला तोरणहार म्हणायला हवं. ओपनिंगला येऊन गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम तो बेमालूमपणे करतोय. गेल, पोलार्ड, वॉटसन उंच उंच षटकार मारतात, तर स्मिथची खासियत फ्लॅट सिक्सर्सची. भयंकर वेगात जमिनीला जवळजवळ समांतर मारलेले षटकार बघताना श्वास रोखला जातो.
गेम चेंजर्स म्हणजे कौशल्यानं, चलाखीनं, संयमानं वाघाच्या जबडय़ातून मुक्तता करून घेणारे आणि गनिमीकाव्यानं शांतपणे विजयश्री खेचून आणणारे खेळाडू. अशा खेळाडूंच्या बाबतीत चेन्नईचा खजिना कुबेराचा आहे. हसी, धोनी, रैना हे सर्वोत्तम गेम चेंजर्स आहेत. स्वत:च्या क्षमतेवर तगडा विश्वास असलेले हे तिघे दहा-बारा धावांची गती खूप जोखीम न घेता दहा ते बारा ओव्हर्स सहज राखू शकतात. हसीला बेव्हनचा पुढचा अवतार म्हटलं जातं, तर धोनी मॅच जिंकून देण्याच्या विद्यापीठाचा शंकराचार्य आहे. रैनाच्या फटक्यांचा कंपास पॉइंटपासून मिडविकेटपर्यंत फिरू शकतो.
टी-२० क्रिकेट, रैनाच्या अन्नपाण्याची झालेली तरतूद आहे. बंगलोरचा कोहली, डिविलीअर्स कोलकात्याचा मॉर्गन, कॅलीस हे असेच लंबी रेस के घोडे आहेत. पण सर्वात परिणामकारक गेम चेंजर्स चेन्नईचेच. धोनीवर नशिबाचा अजिंक्यवर्षांव चालू राहिल्यास नवल वाटायला नको.
sachoten@hotmail.com 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl blog on game changers breakers by ravi patki
First published on: 01-05-2013 at 05:17 IST