दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आतापर्यंतच्या ८ सामन्यांपैकी ६ सामने गमावले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकला गेलेल्या दिल्ली संघासाठी आता प्रत्येक सामना हा जणू बाद फेरीचाच असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीची गाठ बुधवारी अनिश्चित कामगिरीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराभवांचे सत्र चालू राहिल्यामुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयसकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली. नेतृत्वाच्या पहिल्याच परीक्षेत श्रेयस उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत त्याने ४० चेंडूंत नाबाद ९३ धावांची खेळी साकारल्यामुळे दिल्लीला ५५ धावांनी दणदणीत विजय साकारता आला.

मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मात्र दिल्लीचा १३ धावांनी पराभव झाला. त्यामुळे पुनरागमनच्या वाटचालीला धक्का बसला आहे. श्रेयस दुर्दैवीरीत्या धावचीत झाला. ऋषभ पंत (४५ चेंडूंत ७९ धावा) आणि विजय शंकर (३१ चेंडूंत ५४ धावा) यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. दिल्लीसाठी श्रेयस आणि ऋषभचा फॉर्म महत्त्वाचा आहे. या दोघांच्या खात्यावर यंदाच्या आयपीएलमध्ये अनुक्रमे ३०६ आणि २५७ धावा जमा आहेत. गोलंदाजीमध्ये दिल्लीची मदार ट्रेंट बोल्टवर असेल. त्याने आतापर्यंत ११ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर उत्तम दडपण आणण्याचे कार्य चोख बजावले आहे.

राजस्थान रॉयल्स आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. ७ सामन्यांपैकी ६ गुण त्यांनी मिळवले आहेत. या संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. बऱ्याचदा विजयानंतर पराभव या संघाच्या वाटय़ाला निश्चित असतो. त्यामुळे बाद फेरीमध्ये स्थान नक्की करण्यासाठी त्यांनाही उर्वरित सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य टिकवावे लागणार आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने ६५ धावा केल्या, तर संजू सॅमसनने धडाकेबाज ४० धावा केल्या. परंतु तरीही अन्य फलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्यामुळे राजस्थानला ११ धावांनी हार पत्करावी लागली. यंदाच्या हंगामात अजिंक्य आणि संजू हे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत.

मात्र बेन स्टोक्स आणि जोस बटलरकडून दर्जाला साजेसा खेळ होत नसल्यामुळे राजस्थानला अपयश येत आहे. गोलंदाजीमध्ये युवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दोन सामन्यांमध्ये ६ बळी घेत प्रभाव दाखवला आहे. श्रेयस गोपाळ आणि के. गौतम यांच्या फिरकीला मात्र अपेक्षित कामगिरी दाखवता आलेली नाही.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 delhi daredevils vs rajasthan royals
First published on: 02-05-2018 at 01:36 IST