Canadian rapper Drake places bet on KKR to win Final vs SRH : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. याशिवाय चाहते फँटसी ॲपवर स्वतःची टीम तयार करण्यात व्यस्त आहेत. या दरम्यान कॅनडाचा रॅपर ड्रेकबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडाचा रॅपर ड्रेकने आजच्या आयपीएल फायनलसाठी कोलकाता नाईट रायडर्सवर लाखो डॉलर्सचा सट्टा लावला आहे.

हैदराबादच्या पराभवाने ड्रेकवर होणार डॉलर्सचा पाऊस –

अनेक ग्रॅमी पुरस्कार मिळालेला प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेकने इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा सट्टा लावला आहे. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल आणि रग्बी यांसारख्या खेळांमध्ये आपल्या प्रचंड सट्टेबाजीमुळे आधीच चर्चेत असलेला ड्रेक यावेळी प्रथमच क्रिकेटवर सट्टेबाजी करत आहे.

केकेआरच्या विजयावर २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा सट्टा –

कॅनेडियन रॅपर ड्रेकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्टेक डॉट कॉमचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबत कोलकाता टीमची ‘कोरबो लोरबो जीतबो’ची टॅगलाइनही लिहिली आहे. स्टेक डॉट कॉम (Stake.com) ही एक ऑनलाइन क्रिप्टोकरन्सी कॅसिनो आहे. ज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर ड्रेक आहे.

हेही वाचा – IPL 2024 Finalवर पावसाचे सावट, KKR vs SRH मधील अंतिम सामना रद्द झाल्यास कोण पटकावणार ट्रॉफी? कसं आहे समीकरण

हैदराबादविरुद्ध कोलकाताचा उत्कृष्ट रेकॉर्ड –

आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम सनरायझर्स हैदराबादपेक्षा खूपच मजबूत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकले होते आणि क्वालिफायर १ सामना देखील ८ गडी राखून जिंकला होता. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदाच्या हंगामात उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जात आहे.

कोलकाता आणि हैदराबाद संघाची प्लेऑफ्समधील कामगिरी –

आज जेतेपदाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाईल, तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता होईल. दोन्ही संघ विजेतेपदासाठीच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून येथे पोहोचले आहेत. क्वालिफायर-१ मध्ये कोलकाताने अहमदाबादमध्ये हैदराबादचा पराभव केला होता. त्याचवेळी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-२ मध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरलेले आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला आयपीएल २०२४ चा चॅम्पियन म्हटले जाईल.